ऑन ड्युटी मोबाईल प्रेम जोपासणारे बस चालक होणार निलंबित

By नरेश डोंगरे | Published: November 4, 2023 05:33 PM2023-11-04T17:33:52+5:302023-11-04T17:35:55+5:30

अधिकाऱ्यांकडून निर्देश : मोबाईलवर बोलताना चालक बस चालवित असल्याचा फोटो ठरणार पुरावा

ST Bus drivers who cultivate mobile phone on-duty will be suspended, warning from authorities | ऑन ड्युटी मोबाईल प्रेम जोपासणारे बस चालक होणार निलंबित

ऑन ड्युटी मोबाईल प्रेम जोपासणारे बस चालक होणार निलंबित

नागपूर : कर्तव्यावर असताना म्हणजेच बस चालवताना कुणी बसचालक मोबाईलवर बोलत असेल आणि त्याचा फोटो अथवा व्हिडीओ कुण्या प्रवाशाने काढून एसटीच्या अधिकाऱ्याकडे पाठविला तर त्या बसचालकाला आपली नोकरी गमवावी लागणार आहे. एसटी महामंडळाने नुकताच हा निर्णय घेतला असून त्यासंबंधीच्या सूचना वजा निर्देश एसटीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विशेष म्हणजे, या संबंधाचे आदेश यापूर्वी ९ वर्षांपूर्वीच एसटीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, त्या आदेशाची फारशी गांभिर्याने कुणी दखल घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध मार्गावर बस चालविताना अनेक चालक बिनधास्तपणे मोबाईलवर बोलत असल्याचे बघायला मिळते. अनेक प्रवाशांच्या जान-मालाची जबाबदारी असलेल्या बसचालकाचा हा निष्काळजीपणा वारंवार उघड झाला असून त्यामुळे अनेकदा विविध मार्गावर छोटे मोठे अपघातही झाल्याचे सांगितले जाते. तरीसुद्धा अनेक चालक मोबाईलवरचे प्रेम कमी करायला तयार नाहीत. प्रवाशांनी या संबंधाने आक्षेप घेतला तर संबंधित चालकासोबत वाद होतो. उगाच अपमाण होण्याच्या भीतीमुळे प्रवाशी या अक्षम्यपणाकडे दुर्लक्ष करतात. नंतर मात्र कुणी प्रवासी निनावी पत्र लिहून वरिष्ठांकडे या प्रकाराची तक्रार करतात.

दरम्यान, एसटीच्या भरारी पथकासह अनेक अधिकाऱ्यांच्याही हा प्रकार लक्षात आल्यामुळे आता अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, सतर्कता विभागाकडून एसटीच्या विभाग प्रमूखांना पत्र पाठविण्यात आले असून, बस चालविताना कुणी चालक मोबाईलवर बोलताना दिसला. त्याचा फोटो किंवा व्हिडीओ कुुण्या प्रवाशाने काढला आणि तो तक्रारीच्या रुपात मिळाला तर त्या चालकावर तातडीने कडक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहे.

भरारी पथक ठेवणार नजर

एसटीतील फुकट्या प्रवाशांना तसेच अन्य गैरप्रकार शोधण्यासाठी भरारी पथक कार्यरत असते. कोणत्याही मार्गवर अचानक हे पथक बसला थांबविते आणि बसची तपासणी करते. आता हे पथक मोबाईलवर बोलत कोणता चालक बस चालवितो का, त्यावरसुद्धा नजर ठेवणार आहे.

यापूर्वीही झाली आहे कारवाई

अशा प्रकारचा धोका पत्करून बस चालविणाऱ्या चालकांवर यापूर्वीही कारवाई झाली आहे. काही महिन्यांपूर्वी वर्धमाननगरातील एक बसचालक असाच मोबाईलवर बोलत वाहन चालविताना आढळला होता. त्या चालकाची चाैकशी करून त्याला लगेच निलंबित करण्यात आले होते.

Web Title: ST Bus drivers who cultivate mobile phone on-duty will be suspended, warning from authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.