धूळ खात आहेत एसटी बस, मेन्टेनन्सची वाढली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 12:56 PM2021-12-03T12:56:52+5:302021-12-03T13:16:59+5:30
एसटी कर्मचारी संपावर असल्याने बसेस डेपोत धूळ खात आहेत. अनेक बसेसची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही त्यात इतक्या दिवसांपासून बसेस बंदावस्थेत असल्याने आता एसटी प्रशासनासमोर बस चांगल्या स्थितीत ठेवण्याची चिंता आहे.
नागपूर : लागोपाठ लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षापासून एसटीचे नुकसान होत आहे. त्यानंतर आता संपामुळेएसटीचे कंबरडे मोडले आहे. एसटीला मेन्टेनन्ससाठी दर महिन्याला हजारो रुपयांची गरज भासते. नुकसान झाल्यामुळे एसटी बसची देखभाल करणे मुश्कील झाले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सोबतच एसटी प्रशासनाचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे; परंतु त्याशिवाय एसटी बसच्या व्यवस्थापनाची चिंताही व्यक्त करण्यात येत आहे. अनेक डेपोत बसेस उभ्या आहेत. एसटी कर्मचारी संपावर आहेत. यात मेकॅनिकचा समावेश आहे. त्यामुळे एसटी प्रशासनासमोर बस चांगल्या स्थितीत ठेवण्याची चिंता आहे. एसटी बसस्थानकावर सर्व बस धूळ खात आहेत. बसस्थानकावर उभ्या बसची अवस्था पाहून असे वाटते की, विभाग बसची देखभाल करण्याबाबत असमर्थ आहे.
आधीच खराब आहेत अनेक बस
एसटीच्या अनेक बसची अवस्था आधीच बिकट आहे. आधीच प्रवाशांसाठी बसची अवस्था चांगली नाही. बसची अवस्था जर्जर झाली आहे. सिटा तुटलेल्या असल्यामुळे बसमधील स्पेअर पार्ट हलतात. एका वाहकाने सांगितले की, कधी- कधी रस्त्यात बस नादुरुस्त होतात. लहान समस्या निर्माण होतात. त्यामुळे बसची स्थिती चांगली करण्याची गरज आहे. बसमध्ये प्रवासी असल्यास त्यांना अधिक त्रास सहन करावा लागतो. बसची स्थिती खराब असल्यामुळे या बसमध्ये प्रवास करण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील प्रवासी संकोच करतात.
लॉकडाऊनमध्ये होती संधी
एसटी बस दुरुस्त करण्याची संधी लॉकडाऊनमध्ये व्यवस्थापनाकडे होती. त्यावेळी सर्व कर्मचारी होते; परंतु बसेसची नियमित देखभालच करण्यात आली. व्यवस्थापनानुसार बसची अवस्था चांगली आहे. काहींची नियमित देखभाल करावी लागते. मात्र, प्रवाशांच्या मते बसची अवस्था चांगली करण्याची गरज आहे. काही बस अशा आहेत ज्यांना चांगल्या पद्धतीने रिपेअर करण्याची गरज आहे.