उपराजधानीतील एसटी बसमध्ये डिझेल भरायलाही नाहीत पैसे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:01 PM2019-12-27T12:01:04+5:302019-12-27T12:02:32+5:30
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला डबघाईचे दिवस आले आहेत. विभागात डिझेल नसल्यामुळे दोन दिवसात जवळपास ३० बसेस रद्द करण्याची नामुष्की आगारावर आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला डबघाईचे दिवस आले आहेत. विभागात डिझेल नसल्यामुळे दोन दिवसात जवळपास ३० बसेस रद्द करण्याची नामुष्की गणेशपेठ, वर्धमानगर, घाट रोड आणि इमामवाडा आगारावर आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. यामुळे एसटी बसने प्रवास करण्यासाठी आलेले शेकडो प्रवासी आल्यापावली परत गेले.
एसटीचा प्रवास सुरक्षित असल्यामुळे हजारो प्रवासी एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना बुधवारी आणि गुरुवारी त्याचा मोठा फटका बसला आहे. महामंडळाने डिझेलचे पैसेच न भरल्यामुळे इंडियन आॅईल कार्पोरेशनने डिझेलचा पुरवठा केला नाही. परिणामी बुधवारी आणि गुरुवारी मध्यवर्ती गणेशपेठ आगार, वर्धमाननगर आगार, घाट रोड आणि इमामवाडा आगारात बसेसमध्ये भरण्यासाठी डिझेलच उपलब्ध नव्हते. त्यामुळे या चारही आगारातील जवळपास ३० बसेस रद्द करण्याची पाळी महामंडळावर आली आहे. यामुळे चंद्रपूरला आणि अमरावतीला जाण्यासाठी आलेले शेकडो प्रवासी आल्यापावली परत गेले. इतर मार्गावरील प्रवाशांनाही त्याचा फटका बसला. विभागीय कार्यालयातून इंडियन आॅईल कार्पोरेशनमध्ये पैसे भरल्यानंतर डिझेलचे टँकर संबंधित आगारात येऊन डिझेलचा पुरवठा करते. परंतु विभागीय कार्यालयातून पैसेच भरले नसल्यामुळे दोन दिवसांपासून इंडियन आॅईल कार्पोरेशनच्या टँकरने डिझेलचा पुरवठा केला नाही. डिझेल नसल्यामुळे दोन दिवसात एसटी महामंडळाच्या महसुलाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
डिझेल संपल्यामुळे अकोल्यात अडकली बस
गणेशपेठ आगारात डिझेल नसल्यामुळे पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बुधवारी कमी डिझेल भरून रवाना करण्यात आले. परंतु अकोल्यात गेल्यानंतर या बसमधील डिझेल संपले. ही बस अकोला आगारात अडकून पडली. बसमधील प्रवाशांनाही डिझेल नसल्यामुळे गाडीतच बसून रहावे लागले. अखेर अकोला आगाराने या गाडीला डिझेल दिल्यामुळे ही गाडी तासभरानंतर पुढील प्रवासासाठी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकही अधिकारी बोलण्यास नाही तयार
डिझेल अभावी नागपुरातील चारही डेपोतील बसेस रद्द होत आहेत. परंतु या गंभीर प्रश्नावर एसटी महामंडळाच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कुणीच बोलण्यास तयार नाही. यावरून एसटीचे अधिकारी या विषयावर किती गंभीर आहेत याची प्रचिती आली.