एसटी महामंडळ स्मार्ट कार्ड गुंडाळण्याच्या तयारीत? अधिकाऱ्यांकडे ठोस माहिती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 08:45 AM2023-02-17T08:45:00+5:302023-02-17T08:45:02+5:30
Nagpur News विविध गटातील प्रवाशांसाठी सवलतीचे मास्टर कार्ड म्हणून एसटी महामंडळाने प्रवासासाठी सुरू केलेली स्मार्ट कार्ड योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहे. ती कधी सुरू होणार याची महामंडळातील अधिकाऱ्यांकडे ठोस अशी माहिती नाही.
नरेश डोंगरे
नागपूर : विविध गटातील प्रवाशांसाठी सवलतीचे मास्टर कार्ड म्हणून एसटी महामंडळाने प्रवासासाठी सुरू केलेली स्मार्ट कार्ड योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहे. ती कधी सुरू होणार याची महामंडळातील अधिकाऱ्यांकडे ठोस अशी माहिती नाही. त्यामुळे ही योजना महामंडळ गुंडाळणार की काय, अशी शंका घेतली जात आहे.
अमृत महोत्सवी वर्षात वाटचाल करणारे राज्य परिवहन महामंडळ (एसटी) विविध गटातील प्रवाशांना बस भाड्याच्या संबंधाने विविध सवलती देते. स्वातंत्र्य संग्राम सैनिक, त्यांच्या विधवा, ज्येष्ठ नागरिक, राज्य- राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धा गाजवणारे खेळाडू, शासनाने सन्मान देऊन गाैरविलेले समाजसेवी आणि अधिस्विकृती धारक पत्रकार आदींचा सवलतीसाठी पात्र ठरलेल्यांमध्ये समावेश आहे. मात्र, प्रवासाची सवलत घेणारांसाठी त्यांना त्यांचे ओळखपत्र, आधार कार्ड, वयाचा पुरावा (यापैकी एक) एसटीच्या वाहकाला दाखविणे आवश्यक आहे. तीन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने या सर्व पुराव्यांना बाजुला करत स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. त्यानुसार, एसटीच्या प्रवासाची सवलत प्राप्त करण्यासाठी अथवा सुरू ठेवण्यासाठी स्मार्ट कार्ड तयार करून देण्यात येऊ लागले. जिल्हा, तालुका पातळीवर वेगवेगळ्या आगारात स्मार्ट कार्ड साठी अर्ज करायचा आणि ते कार्ड मिळवून घ्यायचे, अशी ही योजना होती. त्यानुसार, राज्यभरातील लाखो प्रवाशांनी त्यासाठी अर्ज केले अन् ते बणवूनही घेतले. विशिष्ट कालावधीनुसार, या कार्डाचे नुतनीकरण (रिनोवेशन) करणेही बंधनकारक होते.
या पार्श्वभूमीवर, एप्रिल-मे २०२२ ला एसटी महामंडळाने एक फर्माण काढून एसटीत सवलतीत प्रवास करायचा असेल तर एक महिन्याच्या आत स्मार्ट कार्ड तयार करावे लागेल. या कार्ड शिवाय प्रवासात सवलत दिली जाणार नाही आणि ज्यांच्याकडे एसटीचे स्मार्ट कार्ड नसेल त्यांच्याकडचा दुसरा कोणताही पुरावा (ओळखपत्र) प्रवास भाड्यातील सवलतीसाठी ग्राह्य धरणार नसल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे तर, प्रारंभी स्मार्ट कार्ड तयार करून घेण्यासाठी जुनमध्ये अंतिम मुदत ठरवून देण्यात आली होती. नंतर ती मुदत (तारीख) वेळोवेळी वाढविण्यात आली. आता ही मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे. अर्थात् अंतिम मुदत देण्यात आली असली तरी स्मार्ट कार्ड बणवून देणेच बंद असल्याने कार्ड कुणाकडे बनवावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचमुळे एसटी महामंडळ स्मार्ट कार्डची योजना गुंडाळण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला जोर मिळत आहे.
विभागात ६० हजार कार्ड
एसटीने स्मार्ट कार्ड बंधनकारक केल्यामुळे ते बणवून घेण्यासाठी एसटीच्या विविध आगारात संबंधित प्रवाशांनी, खास करून ज्येष्ठ नागरिकांनी एकच गर्दी केली. ऑगस्ट, सप्टेंबर २०२२ पर्यंत संबंधितांना स्मार्ट कार्ड बणवून देण्यात आले. ऑक्टोबर २०२२ पर्यंत नागपूर विभागात ५९,५१९ जणांनी आपले स्मार्ट कार्ड तयार करून घेतले. त्यात ४९,५१९ कार्ड ज्येष्ठांचे असून, उर्वरित १० हजार कार्ड बनविणारांमध्ये सवलतीसाठी पात्र असलेल्या ईतर घटकांचा समावेश आहे.
तांत्रिक अडचण कोणती ?
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून तांत्रिक अडचण सांगून कार्ड बनविणे बंद असल्याचा फलक ठिकठिकाणी टांगला गेला. नवीन कार्ड मिळणार नाही, फक्त जुन्या कार्डचे नुतणीकरण करून दिले जाईल, असेही सांगू लागले. पुढे तेही रेंगाळले. या संबंधाने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून ठोस माहिती मिळत नाही. मुंबई-पुण्याकडील कंपनीला स्मार्ट कार्ड बनविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. तांत्रिक अडचणीमुळे कार्ड बनविण्याचे थांबले आहे, असे अधिकारी सांगतात. मात्र, ही तांत्रिक अडचण कोणती, त्याचे उत्तर या अधिकाऱ्यांकडे नाही.