एटीएममध्ये एसटी कर्मचाऱ्याला आला अटॅक; सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 09:27 PM2022-01-07T21:27:20+5:302022-01-07T21:27:52+5:30
Nagpur News एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या रामटेक एसटी आगारातील चालक किशाेर गाेविंदराव तराळे (५६) यांचा शुक्रवारी हृदयविकाराने मृत्यू झाला.
नागपूर: एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या रामटेक एसटी आगारातील चालक किशाेर गाेविंदराव तराळे (५६) यांचा शुक्रवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. तराळे यांना तणावामुळे अटॅक आल्याचा आरोप करीत यासाठी परिवहन मंत्री अनिल परब दोषी जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तराळे यांचे चिरंजीव तेजस तराळे आणि संपकरी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तराळे हे आंदोलन मंडपानजीक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये दुपारी तीनच्या सुमारास पैसे काढण्यासाठी गेले होते. संपात सहभागी असल्याने त्यांना दोन महिन्यांपासून वेतन नव्हते. मात्र खात्यात काही पैसे जमा झाल्याची माहिती मिळाल्याने ते एटीएममध्ये गेले होते. तिथे त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. एटीएमच्या चाैकीदाराने लगेच उपोषण मंडपाकडे धाव घेत तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी लागलीच तराळे यांना रामटेक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. इतर संपकरी कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त करीत धरणे मंडपाजवळ निदर्शने केली. तराळे यांचा मृत्यू शासनाकडून मिळणाऱ्या बडतर्फीच्या धमक्यांमुळे झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी यावेळी केला.
दरम्यान, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तेजस तराळे आणि संपकरी कर्मचारी आणि भाजपच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांनी रामटेक पोलीस स्टेशन गाठत या घटनेसाठी परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार पोलीस निरीक्षकांकडे दाखल केली. रामटेक पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
आर्थिक भरपाईची मागणी
मृत किशाेर तराळे यांच्या पश्चात दाेन मुले व मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. परिवहन विभागाने तराळे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी; तसेच कुटुंबातील एकाला एसटी महामंडळात नोकरी द्यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
सन २०१६-२० दरम्यान जो करार झाला, त्या करारानुसार पात्र कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम देण्यात येत आहे. किशोर तराळे यांनाही दरमहा ही रक्कम मिळत होती. त्यांच्यावर कोणतीही निलंबन, बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली नव्हती.
- नीलेश बेलसरे
विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर विभाग.