एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By Admin | Published: June 25, 2016 03:02 AM2016-06-25T03:02:00+5:302016-06-25T03:02:00+5:30

चालकाने बसच्या मागे असलेल्या कारला साईड दिली नाही म्हणून कारमधील चौघांनी बसचालकास शिवीगाळ करीत मारहाण केली. एवढेच नव्हे तर बसची तोडफोड केली.

S.T. Employees' agitation | एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन

एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन

googlenewsNext

बसचालकास मारहाण प्रकरण : चौघांपैकी दोन आरोपी अटकेत, बसच्या काचा फोडल्या
काटोल : चालकाने बसच्या मागे असलेल्या कारला साईड दिली नाही म्हणून कारमधील चौघांनी बसचालकास शिवीगाळ करीत मारहाण केली. एवढेच नव्हे तर बसची तोडफोड केली. मारहाण करणाऱ्या चौघांपैकी दोघांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ काटोल आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ५ वाजता ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत काटोल आगारातून एकही बस बाहेर पडली नव्हती. यात वरुड, मोर्शी, परतवाडा येथून काटोलमार्गे नागपूरला जाणाऱ्या बसेसचाही समावेश होता. या आंदोलनाचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला.
सूरज तिवारी (२३) व अशोक मरकाम दोघेही रा. फेटरी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काटोल आगाराची एमएच-४०/वाय-५३७९ क्रमांकाची भंडारा-काटोल ही बस गुरुवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास नागपूर बसस्थानकाहून काटोलला येण्यासाठी निघाली. ही बस काटोल-नागपूर मार्गावरील नागपूर शहरालगतच्या टोल नाक्याजवळ पोहोचताच तिच्या मागे एक कार होती. रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास ही बस काटोल-नागपूर मार्गावरील कळमेश्वरनजीकचे रेल्वे फाटक बंद असल्याने फाटकाजवळ थांबली. त्यातच बसच्या मागे असलेल्या कारमधील चौघांनी बसचालक सतीश गावंडे यांना साईड का दिली नाही, अशी विचारणा करीत शिवीगाळ करायला सुरुवात केली. हा प्रकारच एवढ्यावर न थांबता, चौघांनी गावंडे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून बसची तोडफोड केली. त्यात बसच्या काचा फोडल्या.
हा प्रकार सुरू असताना वाहन व काही प्रवासी गावंडे यांच्या मदतीला धावले. त्यांनाही या चौघांनी धमकावले. दरम्यान, गावंडे यांनी जखमी अवस्थेत सदर बस कळमेश्वर बसस्थानकावर आणली. त्यांच्यावर कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना लगेच नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी भादंवि ३५३, ३४१, ३३३, १८६ अन्वये गुन्हा नोंदवून शुक्रवारी सकाळी सूरज व अशोकला अटक केली. उर्वरित दोन आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेच्या निषेधार्थ काटोल आगारातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ५ वाजतापासून ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. आरोपींवर कारवाई करून आंदोलनातील कर्मचारी व कामगारांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली. त्यातच अधिकाऱ्यांनी कामगार नेत्यांची समजूत काढत आधी बसेस सुरू करण्याची सूचना केली. कारवाई करणार नसल्याचे आश्वासन देताच कामगारांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर सकाळी ११ वाजतापासून काटोल आगारातील सर्व बसेस बाहेर पडायला सुरुवात झाली.
बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने ठाणेदार दिगंबर चव्हाण यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राठोड यांनी बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)

प्रवाशांचे हाल
या आंदोलनामुळे काटोल आगारातील सर्व बसेस तसेच वरुड, मोर्शी, परतवाडा, अमरावती, जळगाव (जामोद) आगाराच्या काटोलमार्गे नागपूरला जाणाऱ्या बसेस काटोल बसथानकात अडकून पडल्या होत्या. त्यामुळे बसस्थानकात सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण ७२ बसेस उभ्या होत्या. यात चंद्रपूर, राजुरा, माहूर, भंडारा, तुमसर, वर्धा, नागपूर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेसचा सावेश होता. परिणामी, शेकडो प्रवासी अडकून पडल्याने त्यांचे हाल झाले. शिवाय, काटोल आगाराची एकही बस ग्रामीण भागात न गेल्याने गावांमधील प्रवाशांची गैरसोय झाली होती. या आंदोलनामुळे आगाराचे अंदाजे ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगार प्रमुख शीतल शिरसाठ यांनी दिली.
अधिकाऱ्यांशी चर्चा
काटोलचे आगार प्रमुख शीतल शिरसाठ यांनी या आंदोलाची तसेच घटनेची माहिती प्रादेशिक नियंत्रकांना दिली. त्यामुळे एसटीचे नागपूर येथील तांत्रिक यंत्र अधिकारी अमोल गाडबैल, वरिष्ठ आगार व्यवस्थापक एस. एस. हेडाऊ, विभागीय कामगार अधिकारी वाकोडीकर काटोल येथे पोहोचले. त्यांनी इंटक एस. टी. वर्कर्स संघटनेचे अरुण भागवत, शेषराव पावडे, आर. एस. भांगे, के. व्ही. सांगण, सतीश पुरी, श्रीकांत घाटोळे, अब्दुल नहीम, गणेश वानखेडे, गुड्डू पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कामगारांशी चर्चा केली.

Web Title: S.T. Employees' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.