मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने सुरू केली राज्यातील पहिली लिंगबदल ओपीडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:14 AM2018-09-28T10:14:52+5:302018-09-28T10:15:19+5:30
बीडचे पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर केलेल्या यशस्वी लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने लिंग बदल करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता स्वतंत्र ओपीडी विभाग सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: बीडचे पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर केलेल्या यशस्वी लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाने लिंग बदल करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता स्वतंत्र ओपीडी विभाग सुरू केला आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच विभाग आहे.
रुग्णालयाने यासोबतच इंटरसेक्स वॉर्डही सुरू केला आहे. या ओपीडी व वॉर्डाचे उद््घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
या सर्व बदलांमागे बीडच्या साळवे यांचा मोठा सहभाग आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना जेव्हा येथे लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आले होते तेव्हा त्यांना कुठल्या वॉर्डात ठेवायचे याबाबत रुग्णालय प्रशासनामध्ये संभ्रम होता. त्यामुळे त्यांना अतिविशिष्ट व्यक्तींच्या सूटमध्ये ठेवण्यात आले.
लिंगबदलाकरिता आमच्याकडे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांचे सांगणे आहे. त्यामुळे रुग्णालयाने इंटर सेक्स वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला. याप्रकारचा उपक्रम राबवणारे हे पहिलेच रुग्णालय ठरले आहे. या रुग्णालयाकडे आतापर्यंत १३ रुग्णांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेबाबत विचारणा केली आहे.