लोकमतच्या वृत्तामुळे एसटीला मिळाले ३०० कोटी लोकमत इम्पॅक्ट !
By नरेश डोंगरे | Published: January 13, 2023 07:03 PM2023-01-13T19:03:02+5:302023-01-13T19:03:13+5:30
दुसरा आठवडा पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सरकारने त्याची दखल घेतली.
नागपूर : दुसरा आठवडा पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सरकारने त्याची दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाने आज ३०० कोटी रुपये दिले. परिणामी एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी आनंद निर्माण झाला आहे.
राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसेसचे संचलन, व्यवस्थापन आणि देखभालीची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना आठवडा उलटून जातो, मात्र पगार मिळत नाही. कधीतरी शासन या बिचाऱ्यांच्या पगाराची व्यवस्था करते. परिणामी एसटीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचीही मोठी कोंडी होते. गेल्या काही महिन्यांपासून कधी पगार मिळणार याची शाश्वती नसल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यांच्यापैकी अनेकांचे जगणे उधारीवर झाले आहे. गेल्या वर्षीपर्यंत सुरू असलेला हा प्रकार नवीन वर्षात थांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र, जानेवारी महिन्याची १२ तारिख होऊनही डिसेंबरचा पगार मिळाला नाही. त्यामुळे एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर, शुक्रवार १३ जानेवारीच्या अंकात लोकमतने एसटीच्या कर्मचाऱ्यांची व्यथा तसेच त्यांच्यात निर्माण झालेल्या रोषाचे वृत्त 'एसटी कर्मचाऱ्यांना घामाचा दाम मिळेना' या शिर्षकाखाली प्रकाशित केले. त्याची दखल घेत सरकारने एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३०० कोटी रुपये उपलब्ध करून देत असल्याचे जाहिर करतानाच हा निधीही दिला. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, लोकमतच्या वृत्तामुळे हे झाल्याची भावना झाल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आज आनंदोत्सव केला आहे.
नागपूर विभागाला ६.१७ कोटी
नागपूर विभागात एसटीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या २५२० एवढी आहे. त्यांच्या पगारावर महिन्याला साधारण: सहा ते सव्वासहा कोटी रुपये खर्च होतात. सरकारने आज एसटीला दिलेल्या ३०० कोटींमधून नागपूर विभागाला ६ कोटी, १७ लाख रुपये मिळाले आहेत.