भंगार विक्रीतून एसटीला मिळाले २.५७ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:09 AM2021-02-26T04:09:47+5:302021-02-26T04:09:47+5:30
नागपूर : कोरोनामुळे तोट्यात सुरू असलेल्या एसटी महामंडळाला भंगार झालेल्या बसेसच्या विक्रीमुळे दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर विभागात ...
नागपूर : कोरोनामुळे तोट्यात सुरू असलेल्या एसटी महामंडळाला भंगार झालेल्या बसेसच्या विक्रीमुळे दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर विभागात भंगार विक्रीतून २ कोटी ५७ लाख रुपये मिळाले आहेत. यात भंगार झालेल्या ४५ बसेसचाही समावेश आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही प्रशासनाकडे पैसे नव्हते. अखेर महाराष्ट्र शासनाने विविध सवलतींची शिल्लक असलेली रक्कम दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन देणे शक्य झाले. अशा स्थितीत महामंडळास भंगार झालेल्या बसेसमुळे दिलासा मिळत आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने केलेल्या भंगार विक्रीत जुन्या बसेस, गाडीच्या सीट, दरवाजे आदींचा समावेश आहे. २०२० च्या अखेरीस भंगार विक्रीतून एसटीच्या नागपूर विभागाला ५० लाख रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला होता.
नियमानुसार वर्षभरात दोन वेळा भंगाराचा लिलाव होण्याची गरज आहे. मागील वर्षाच्या अखेर लिलाव झाल्यानंतर यावर्षी झालेला हा पहिला लिलाव आहे. २०२१ मध्ये आणखी एकदा लिलाव होणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.
...............