एसटीचे दररोज होतेय ४७ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:07 AM2021-05-06T04:07:36+5:302021-05-06T04:07:36+5:30
प्रवासी घटले : जिल्ह्यात फक्त २५ फेऱ्यांची वाहतूक दयानंद पाईकराव नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक कारणासाठीच ...
प्रवासी घटले : जिल्ह्यात फक्त २५ फेऱ्यांची वाहतूक
दयानंद पाईकराव
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्याची अट घालून दिली. त्यामुळे एसटीचे दररोज ४७ लाखांचे नुकसान होत असून, नागपूर जिल्ह्यात केवळ २५ फेऱ्यांची वाहतूक होत आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने २२ मार्च २०२० पासून १५ सप्टेंबर २०२० पर्यंत एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटीची वाहतूक सुरू झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२० तसेच जानेवारी आणि १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एसटीची वाहतूक सुरळीत सुरू होती; परंतु त्यानंतर एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा निर्णय घेतल्यामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले होते. एका बसमध्ये केवळ २२ प्रवासीच बसविण्यात येत होते. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा १५ एप्रिल २०२१ पासून १ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. हे लॉकडाऊन १५ मे २०२१ पर्यंत वाढविण्यात आले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे केवळ अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्याचे बंधन महाराष्ट्र शासनाने घालून दिले आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत कमालीची घट झाली. कोरोनाच्या पूर्वी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ७२० फेऱ्यांची वाहतूक होत होती. ४१० बसेस १ लाख ६० हजार किलोमीटरचा प्रवास करीत होत्या; एकूण २० हजार प्रवाशांच्या वाहतुकीद्वारे नागपूर विभागाला दररोज ४८ लाखांचे उत्पन्न मिळत होते; परंतु अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासाची अट घालण्यात आल्यामुळे एसटीचे उत्पन्न घटले आहे. सध्या विभागात १० बसेसच्या माध्यमातून २५ फेऱ्या चालविण्यात येत आहेत. केवळ ३ हजार किलोमीटर बसेस धावत असून, विभागाला दररोज फक्त ६० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. यात प्रवाशांची संख्या ६०० वर आली आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाला लॉकडाऊनमुळे चांगलाच फटका बसला आहे. लॉकडाऊन आणखी वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
.............
शासनाच्या निर्देशानुसार वाहतूक सुरू
‘सध्या ५० टक्के आसन क्षमतेने बसेस चालविण्यात येत आहेत. आवश्यक कारणासाठी प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. शासनाच्या निर्देशाचे पालन करून विभागात एसटीची वाहतूक सुरू आहे.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.
...............