७,५०० निवृत्त कर्मचाऱ्यांची एसटीकडे १८२ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:08 AM2021-07-07T04:08:36+5:302021-07-07T04:08:36+5:30
दयानंद पाईकराव नागपूर : आपल्या आयुष्याची सोनेरी वर्ष एसटीच्या सेवेत दिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही कार्यालयात हेलपाटे घालण्याची पाळी आली ...
दयानंद पाईकराव
नागपूर : आपल्या आयुष्याची सोनेरी वर्ष एसटीच्या सेवेत दिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही कार्यालयात हेलपाटे घालण्याची पाळी आली आहे. निवृत्त झाल्यानंतर कुटुंबीयांसोबत आनंदात राहू असा विचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच आली आहे. राज्यभरातील ७,५०० निवृत्त कर्मचाऱ्यांचे १८० कोटी रुपये एसटीकडे असून ही थकबाकी एकरकमी देण्यात यावी, अशी मागणी संतप्त कर्मचारी करीत आहेत.
कोरोनामुळे एसटीची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटीकडे पैसे नाहीत. या परिस्थितीमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांसोबत निवृत्त कर्मचारीही अडचणीत सापडले आहेत. अनेक कर्मचारी आपल्या कार्यकाळात निवृत्तीनंतर चार पैसे अधिक मिळावेत यासाठी सुट्या घेत नाहीत. एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांना ३०० सुट्यांचे पैसे देण्याचा नियम आहे. निवृत्तीनंतर शिल्लक असलेल्या सुट्यानुसार त्यांना पैसे मिळतात. त्यामुळे सलग ड्युटी करून कर्मचारी आपल्या सुट्या शिल्लक ठेवतात. परंतु निवृत्तीनंतरही हे पैसे मिळाले नसल्यामुळे राज्यातील ७,५०० निवृत्त झालेले एसटीचे कर्मचारी संकटात सापडले आहेत. याशिवाय २०१६ ते २०२० या कालावधीसाठी २०१९ मध्ये एसटी महामंडळाने एकतर्फी करार केला. या करारात कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या वेतनवाढीचे पैसेही निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. निवृत्त झालेले अनेक कर्मचारी मृत्यू पावले असून, उर्वरित कर्मचारी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत. निवृत्तीनंतर एसटी महामंडळाकडून मिळालेली रक्कम हीच त्यांच्या जगण्याचा आधार असतो. त्यामुळे एसटी महामंडळाने निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने थकबाकीची रक्कम देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी राज्यभरातील निवृत्त झालेले कर्मचारी करीत आहेत.
..............
निवृत्तीनंतर पैशासाठी छळू नये
‘निवृत्त झाल्यानंतर एसटी महामंडळाकडून मिळालेली रक्कम हाच कर्मचाऱ्यांना जीवन जगण्यासाठी एकमेव आधार असतो. परंतु निवृत्त झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसतील तर यासारखे दुसरे दुर्दैव नाही. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम तातडीने देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.’
- अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
..........