नागपुरात कामगारांना सोडण्यासाठी एसटी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 01:44 AM2020-05-08T01:44:39+5:302020-05-08T01:46:32+5:30
लॉंकडाऊनमुळे अडकून पडलेल्या क.ामगारांना सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानुसार कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉंकडाऊनमुळे अडकून पडलेल्या क.ामगारांना सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानुसार कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाकडून आदेश मिळताच एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विविध राज्यांतील कामगारांना आपल्या मूळ गावी जाता यावे यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचा प्रवास योग्य असला तरी जवळपास जाणाºया कामगारांसाठी एसटी बसेस उपयुक्त आहेत. अशा कामगारांनी आपली नावे जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली आहेत. त्यानुसार याद्या तयार करण्याचे आणि कामगारांना सोडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. कोणत्याही क्षणी प्रशासनाकडून बसेस सोडण्याच्या सूचना येऊ शकतात. यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने शंभराहून अधिक बसेस तयार ठेवल्या आहेत. बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून चालक-वाहकांनाही तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हरियाणाच्या विद्यार्थ्यांना सोडले घरी
लॉकडाऊनमुळे हरियाणाचे विद्यार्थी पारशिवनीच्या शाळेत अडकून पडले होते. १८ विद्यार्थी, १ शिक्षक यांना एसटी बसने हरियाणाला सोडण्यात आले. ही बस १ मे रोजी पारशिवनी येथून निघाली आणि ४ मे रोजी परत आली. त्यापूर्वी राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही एसटी बसने आणण्यात आले होते. बुधवारीही नागपूर रेल्वेस्थानकावर येणाºया कामगारांना एसटीच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
कमी दरात देणार सेवा
एसटी महामंडळाच्या वतीने ५६ रुपये प्रति किलोमीटर या प्रमाणे प्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध करून देण्यात येतात. शासकीय कामासाठी ४४ रुपये प्रति किलोमीटर आकारण्यात येतात. त्यामुळे कामगारांना जाण्यासाठी ४४ रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी एसटी प्रशासनाने केली आहे. कामगारांना सोडण्यासाठी ३०० ते ३५० बसेसची मागणी होऊ शकते, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.