एसटीच्या मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांची आता तीन वर्षांनंतर उचलबांगडी; विभागीय कार्यालयांना आदेश
By दयानंद पाईकराव | Published: December 8, 2022 03:08 PM2022-12-08T15:08:48+5:302022-12-08T15:10:20+5:30
गैरप्रकार टाळण्यासाठी वाहतूक महाव्यवस्थापकांचा निर्णय
नागपूर :एसटीच्या वाहकांनी (कंडक्टर) अफरातफर करू नये यासाठी आणि त्यांची बस मार्गात तपासण्यासाठी एसटी महामंडळाच्या सर्व विभागात मार्ग तपासणी पथक नेमण्यात आली आहेत. परंतु अनेक विभागात या पथकात तेच कर्मचारी आणि तेच वाहक वर्षानुवर्ष कार्यरत आहेत. त्यामुळे वाहन तपासणी कर्मचाऱ्यांचे एसटीच्या वाहकांशी मधुर संबंध निर्माण होऊ शकत असल्याने दर तीन वर्षांनी मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांची बदली करावी, असा आदेश वाहतूक महाव्यवस्थापकांनी महाराष्ट्रातील ३२ विभागांना दिला आहे.
एसटी महामंडळात प्रवाशांशी कंडक्टरचा थेट संबंध येतो. प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना तिकीट देण्याचे काम कंडक्टर करतात. प्रवाशांकडून मिळालेली रक्कम ड्युटी संपल्यानंतर ते आपापल्या डेपोत रोखपालाकडे जमा करतात. परंतु मार्गात प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना तिकीट न देण्याचे गैरप्रकार अनेकदा काही कंडक्टरकडून करण्यात येतात. त्यामुळे अशा कंडक्टरवर वचक रहावा यासाठी एसटी महामंडळाच्या मार्ग तपासणी पथकाकडून मार्गात अचानक बस उभी करून ती तपासण्यात येते. कंडक्टरने सर्व प्रवाशांना तिकीट दिले की नाही, याची तपासणी पथकातील कर्मचारी करतात. तिकीट न देता प्रवासी प्रवास करीत असल्याचे लक्षात आल्यास संबंधित प्रवाशाचे बयाण नोंदवून कंडक्टरवर कारवाई करण्यात येते. परंतु अनेक विभागात मार्ग तपासणी पथकातील कर्मचारी वर्षानुवर्ष पथकात काम करीत असल्याचे उघड झाले. त्यामुळे एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी तीन वर्षे झालेल्या मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांचे वाहकांशी मधुर संबंध निर्माण होऊ नयेत यासाठी हा महत्त्वाचा आदेश मानल्या जात आहे. या आदेशामुळे एसटी महामंडळातील गैरव्यवहारांना आळा बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तीन वर्षांनंतर बदली हा प्रशासकीय नियम
प्रशासनात काम करताना तीन वर्षांनंतर महत्त्वाच्या विभागातील कर्मचाऱ्यांची बदली करावी हा नियम आहे. मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांचे वाहकांशी हितसंबंध निर्माण होऊ नये, यासाठी दर तीन वर्षांनी त्यांची बदली करण्याचा आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. यामुळे एसटीच्या कारभारात सुसूत्रता निर्माण होईल.
- शिवाजी जगताप, वाहतूक महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ मुंबई
‘लोकमत’ने केली होती भीती व्यक्त
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात भंडारा मार्गावरील शिवशाही बसेसच्या स्पॉट बुकिंगमध्ये गेल्या पाच वर्षांपासून गैरव्यवहार होऊन प्रवाशांना शून्य दराची तिकिटे देण्यात येत असल्याचा घोटाळा उघड झाला होता. भंडारा विभागातील मार्ग तपासणी पथकाने हा घोटाळा उघडकीस आणला होता. परंतु नागपूर विभागातील मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना हा घोटाळा कसा दिसला नाही, असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित करून नागपूरच्या मार्ग तपासणी पथकात अनेक वर्षांपासून तेच कर्मचारी कार्यरत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त मुंबईतील एसटीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्यानंतर मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांची तीन वर्षांनी बदली करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.