एसटी सुरू करणार पार्सल कुरिअर सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:38 AM2020-10-15T11:38:28+5:302020-10-15T11:40:18+5:30
Nagpur News, S T आता एसटीने पार्सल कुरिअर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील बसस्थानकावर आता कोणीही पार्सल कुरिअर घेऊन गेल्यानंतर त्यांचे पार्सल कुरिअर दुसऱ्याच दिवशी संबंधित व्यक्तीला मिळणार आहे.
दयानंद पाईकराव
नागपुर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने मालवाहतूक सुरू केली. त्यानंतर आता एसटीने पार्सल कुरिअर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील बसस्थानकावर आता कोणीही पार्सल कुरिअर घेऊन गेल्यानंतर त्यांचे पार्सल कुरिअर दुसऱ्याच दिवशी संबंधित व्यक्तीला मिळणार आहे.
कोरोनामुळे सहा महिने एसटी बसेस ठप्प होत्या. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटीकडे पैसे नव्हते. अशा स्थितीत एसटी बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करून माल वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु प्रत्येकाला संपुर्ण ट्रक बुक करणे शक्य नाही. त्यामुळे आता एसटीने पार्सल कुरिअर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीने एसटी महामंडळाकडे पार्सल कुरिअर बुक केल्यास लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित व्यक्तीला पार्सल कुरिअर मिळणार आहे. एसटीचे संपूर्ण राज्यात नेटवर्क आहे. त्यामुळे पार्सल कुरिअरला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. यात नागरिक एक किलोपासून १ हजार किलोपर्यंतचे पार्सल कुरिअर बुक करू शकतात. पूर्वी एसटी महामंडळाने खासगी कंपनीला हे कंत्राट दिले होते. परंतु आता एसटीने हे काम हाती घेतल्यामुळे महामंडळाचा आर्थिक फायदा होणार असून नागरिकांनाही त्वरित सेवा मिळणार आहे.
उत्पन्नासाठी चांगला निर्णय
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती खराब आहे. महामंडळ उत्पन्न वाढविण्यासाठी चांगले निर्णय घेत आहे. एसटीचे संपूर्ण राज्यात जाळे आहे. त्यामुळे पार्सल कुरिअर सेवा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पार्सल कुरिअर सेवा सुरु केल्यास एसटीला नक्कीच फायदा होईल.
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)