अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक

By admin | Published: August 7, 2016 02:20 AM2016-08-07T02:20:44+5:302016-08-07T02:20:44+5:30

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी दुपारी गांधीसागर रोड ते शनिवार बाजार दरम्यान अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.

Stacked up against encroachment team | अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक

अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक

Next

गांधीसागर रोडवरील घटना : जेसीबी चालकाला मारहाण, वाहनाच्या काचा फोडल्या
नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी दुपारी गांधीसागर रोड ते शनिवार बाजार दरम्यान अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या कारवाईला तीव्र विरोध करीत काही असामाजिक तत्त्वांनी पथकावर दगडफेक केली.जेसीबी चालकाला मारहाण करण्यात आली. वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या. यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दगडफेकीमध्ये पथकातील काही कर्मचारी जखमी झाले. यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलीस नियंत्रण कक्षाने गणेशपेठ पोलिसांना कळविताच काही वेळातच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस येताच दगडफेक करणारे पसार झाले. तर दोघांना अटक करण्यात आली. दगडफेकीची माहिती मिळताच पथकाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक राजेश मेश्राम व अन्य अधिकारीही तेथे पोहचले. तगड्या पोलीस बंदोबस्तात गांधीसागर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. रजवाडा पॅलेसच्या समोर असलेले दोन पानठेले व एक मशीन तोडण्यात आली.
पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ नंबर नाका ते गांधीसागर तलाव व रमण विज्ञान केंद्र मार्गावरील टी पॉर्इंट चौकापर्यंत शनिवार बाजार लागायचा. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून दुकानदारांनी गांधीसागर चौक ते रजवाडा पॅलेस चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लावण्यास सुरुवात केली असल्याच्या तक्रारी मिळाल्या. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याने पथकातील अधिकाऱ्यांना संबंधित अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पथक पुन्हा गांधीसागर रोडवर अतिक्रमण हटविण्यासाठी पोहचले.
तेथे कारवाई करीत पानठेले व कोल्ड्रिंक विक्रेत्या युवकांना हटविले असता पाच-सहा युवक पथकाच्या जेसीबी समोर दगड घेऊन उभे झाले. काही युवक जेसीबीच्या समोर खाली झोपले. कर्मचाऱ्यांनी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या युवकांनी दग़डफेक सुरू केली. पोलिसांनी आरोपी युवकांना ताब्यात घेतले व गणेशपेठ ठाण्यात घेऊन गेले. (प्रतिनिधी)

Web Title: Stacked up against encroachment team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.