गुणवत्ता सिद्ध करूनही कर्मचारी उपेक्षित का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:03+5:302020-12-23T04:07:03+5:30
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सवाल : काम बंद आंदोलनाचा ऑनलाईन प्रशिक्षणाला फटका नागपूर : राज्याचा शिक्षण विभाग ...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सवाल : काम बंद आंदोलनाचा ऑनलाईन प्रशिक्षणाला फटका
नागपूर : राज्याचा शिक्षण विभाग आणि शाळा यांच्यामध्ये सेतू म्हणून काम करणारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला लॉकडाऊनच्या काळात दिलेल्या सर्व उपक्रमात गुणवत्ता सिद्ध केली आहे. लॉकडाऊनच्या काळातील ऑनलाईनच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना शासनाने उपेक्षित ठेवले आहे. चार महिन्यापासून वेतनापासून वंचित असलेल्या या कर्मचाऱ्यांनी आमचा काय दोष, असा सवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला केला आहे. कर्मचाऱ्यांनी वेतन नसल्यामुळे काम बंद आंदोलन केल्याने ऑनलाईन प्रशिक्षणाला फटका बसला आहे.
सप्टेंबर महिन्यापासून या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. राज्यात या संस्थेत ९०० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्याची सर्व जबाबदारी पार पाडली. कार्यक्षमता प्रतवारी दर्शक (पीजीआय), असर अहवाल, राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण, निष्ठा प्रशिक्षण, दीक्षा अॅप, शिक्षण परिषदेचे प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आले. या उपक्रमातून राज्याला देशाच्या अव्वलस्थानी पोहचविले. ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्यानंतरही पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकी, स्वाध्यायमाला उपक्रमाचा आढावा घेण्याचे काम अजूनही सुरू आहे. पण आता ही कामे करण्याची कर्मचाऱ्यांची मानसिकता राहिली नाही. चार महिन्यापासून वेतन नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. नागपूर जिल्ह्यातील संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी मुलाबाळासह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
ही संस्था केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानावर चालते. या संस्थेला नॉन प्लॅनमध्ये घ्यावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. शीर्षस्थ संस्थेने केलेल्या चुकांचा त्रास आम्हाला सहन करावा लागत असल्याची भावना येथील कर्मचाऱ्यांची आहे. जिल्ह्यात १८ कर्मचारी असून, कार्यालय ठप्प पडले आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा असून अधिकारी, मंत्री यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून आर्जव केले जात आहे.
- हे कर्मचारी कुटुंबासह वेतनासाठी माझ्याकडे येतात. आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतो आहे. पण वर कुणीच दखल घ्यायला तयार नाही. कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे त्यांच्याकडून काम करवून घेण्यास मी हतबल आहे.
हर्षलता बुराडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था