नागपूर जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेतून कर्मचारी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:34 PM2019-07-10T23:34:48+5:302019-07-10T23:35:42+5:30

ग्रामीण विकास विभागाने जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेच्या पदांना मोठी कात्री लावली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या ४५ वरून १८ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या विभागाकडे महिला सक्षमीकरणाचे मोठे काम आहे. गावागावातील लाखो महिला या विभागाशी जुळलेल्या असून लाभ घेत आहेत. परंतु विभागाचा नवीन आकृतिबंध बघता सरकार विभाग बंद करतेय की काय, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

Staff reduction in the rural development system of Nagpur Zilla Parishad | नागपूर जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेतून कर्मचारी कपात

नागपूर जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेतून कर्मचारी कपात

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या आकृतिबंधात पदसंख्या अर्ध्यापेक्षाही कमी : केवळ १८ कर्मचारी कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण विकास विभागाने जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेच्या पदांना मोठी कात्री लावली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या ४५ वरून १८ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या विभागाकडे महिला सक्षमीकरणाचे मोठे काम आहे. गावागावातील लाखो महिला या विभागाशी जुळलेल्या असून लाभ घेत आहेत. परंतु विभागाचा नवीन आकृतिबंध बघता सरकार विभाग बंद करतेय की काय, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांमध्ये ग्रामीण विकास यंत्रणा या संस्थेची स्थापना करण्यात आली. गरीब कुटुंबांना वैयक्तिक व सामूहिक योजनांमध्ये लाभ देणे, महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे प्रशिक्षण देण्याचेही काम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केले जाते. याशिवाय गरीब मागासवर्गीय लोकांसाठी घरकूल योजना तसेच ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजना, पारधी लोकांसाठी पारधी आवास योजना, आदी योजना या विभागाच्या वतीने राबविण्यात येतात.
या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत या विभागाला स्वतंत्र जागा देण्यात आली व त्याकरिता कर्मचारीवर्गही उपलब्ध करून दिला. या विभागाची स्थापना करण्यात आली त्यावेळी या विभागात अधिकारी, कर्मचारी मिळून ४५ जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मात्र या विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली. दुसरीकडे योजनांची संख्या मात्र वाढत होती. रोज एका नव्या योजनेची भर पडत आहे. असे असताना या विभागाचा नवीन आकृतिबंध जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये केवळ १८ कर्मचाऱ्यांची संख्या ठेवण्यात आली आहे. याचा परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर होणार आहे. कर्मचाºयांच्या अपुऱ्या संख्येमुळे योजना रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अशी झाली पदांची कपात
सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांची संख्या ५ वरून केवळ १ ठेवण्यात आली आहे. सहायक लेखाधिकाऱ्यांची २ पदे रिकामी करण्यात आली आहेत. विस्तार अधिकाऱ्यांच्या पदांनाही कात्री लावण्यात आली आहे. वरिष्ठ सहायक, वाहन चालक, शिपाई यांची प्रत्येकी दोन पदे ठेवण्यात आली आहेत. उर्वरित सर्व पदांना कात्री लावण्यात आली असून एकच पद ठेवण्यात आले आहे. त्यात कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहायक, लेखाधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी, अधीक्षक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी यांचे प्रत्येकी एक पद नव्या आकृतिबंधात ठेवले आहे.

Web Title: Staff reduction in the rural development system of Nagpur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.