नागपूर शहरात ठिकठिकाणी तुंबले पाणी : नागरिकांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:03 PM2020-01-02T23:03:59+5:302020-01-02T23:08:22+5:30
नागपूर शहर व परिसरात गुरुवारी सकाळी जोराचा पाऊ स झाला. तास-तासाच्या पावसामुळे सखल भागातील वस्त्यात पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर व परिसरात गुरुवारी सकाळी जोराचा पाऊ स झाला. तास-तासाच्या पावसामुळे सखल भागातील वस्त्यात पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. कपीलनगर, जोगीनगर, रामेश्वरी पार्वतनीगर, बेलतरोडी, मनिषनगर आदी भागात पाणी तुबल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. मनिषनगर पुलाखाली तसेच धंतोली रेल्वे अंडरब्रीज खाली पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. म्हाळगीनगर चौकातील रस्त्यावर झाड पडल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. यामुळे अग्निशमन विभागाची तारांबळ उडाली होती.
कपीलनगर येथे पाणी तुंबले होती. जोगीनगर येथील प्लाट १९० व १९२ वर पाणी साचले होते. सिंमेट रोडच्या उंच बांधकामामुळे रस्त्यालगतच्या भागात पाणी साचले होते. हुडकेश्वर रोडवरील सुयोगनगर येथे पाणी साचले होते. हुडकेश्वर नगर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेली वाहने पाण्याखाली बुडाली होती. नरेंद्र नगर पुलासाखाली दोन ते तीन फूट पाणी साचले होते. पाण्यातच कार बंद पडली होती. एअरपोर्ट सेंटर पाईंट समोरील नवीन पुलाखाली अशीच अवस्था होती. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
कमळना मार्केट परिसरात ठिकठिकाणी पाणी तुंबले. त्यातच मेट्रो रेल्वे काम सुरु असल्याने पावसाळी नाल्या बुजल्याने मेट्रो रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचले होते. कमणना मार्केट रोडवर जागोजागी पाणी तुंबल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होतो.
महापौरांनी गाठले ‘सिटी ऑपरेशन सेंटर’
गुरुवारी सकाळी जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. नरेंद्रनगर, कॉटनमार्केट व एअरपोर्ट हॉटल सेंटर पॉईंट येथील पुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरात गंभीर घटना तर घडली नाही ना, याची माहिती घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी सकाळी १० च्या सुमारास महापालिका मुख्यालयातील ‘सिटी ऑपरेशन सेंटर ’गाठले. संपूर्ण शहरातील परिस्थितीची पाहणी केली.अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. अग्निशमन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडचे राजेश दुफारे उपस्थित होते. सिटी ऑपरेशन सेंटरमधून त्यांनी शहरातील सर्व झोनमधील भागांची पाहणी केली. पावसामुळे नेहमी बाधीत होत असलेल्या भागांचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान कुठेही परिस्थिती हाताबाहेर गेले नसल्याचे त्यांना आढळले.