आंबेडकरी समाजातील विद्वानांमध्ये गतिशून्यता निर्माण झाली : पूरणचंद्र मेश्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:32 AM2018-01-17T00:32:35+5:302018-01-17T00:33:46+5:30
गेल्या काही वर्षात पीएचडी प्राप्त करणाऱ्या विद्वानांचे कार्य हे सहा. प्राध्यापकाची नोकरी मिळण्यापुरते मर्यादित झाले आहे. विद्यापीठात पीएचडीनंतर रिसर्च प्रोजेक्टचा अर्ज करणाऱ्या आंबेडकरी विद्वानांची संख्या केवळ एक टक्का आहे. त्यामुळे समाजातील विद्वानांमध्ये गतिशून्यता येत असल्याची खंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये ज्ञान देणाऱ्या प्राध्यापकांचे संशोधन व समाजकार्य अव्याहतपणे सुरू असले तर ते पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरतात. मात्र गेल्या काही वर्षात पीएचडी प्राप्त करणाऱ्या विद्वानांचे कार्य हे सहा. प्राध्यापकाची नोकरी मिळण्यापुरते मर्यादित झाले आहे. विद्यापीठात पीएचडीनंतर रिसर्च प्रोजेक्टचा अर्ज करणाऱ्या आंबेडकरी विद्वानांची संख्या केवळ एक टक्का आहे. त्यामुळे समाजातील विद्वानांमध्ये गतिशून्यता येत असल्याची खंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाच्या पाली प्राकृत विभागाच्या प्रमुख डॉ. मालती साखरे यांनी पाली विषयातील संशोधन ग्रंथासाठी विद्यापीठाची सर्वोच्च डी. लिट. पदवी प्राप्त केली. यानिमित्त आंबेडकराईट्स मुव्हमेंट आॅफ कल्चर अॅन्ड लिटरेचर संस्थेतर्फे त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पूरणचंद्र मेश्राम बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. प्रकाश खरात, संस्थेचे दादाकांत धनविजय, डॉ. प्रज्ञा बागडे आदी मान्यवर उपस्थित होते. पूरणचंद्र मेश्राम पुढे म्हणाले, ज्ञान निर्मितीचे काम महत्त्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक उत्कृष्टता प्राप्त केली व विद्वत्तेची उपयोगिता सिद्ध केली. डी. लिटसाठी प्रबंध सादर केल्यानंतर कठीण तपासणीतून जावे लागते. संबंधित व्यक्तीने निवडलेल्या विषयावर जगात कुणीही तसे संशोधन केलेले नसणे आवश्यक आहेत. त्यामुळेच प्रबंध सादर करूनही त्यातील ९९ टक्के अपयशी ठरतात. अशा परिस्थितीत डॉ. मालती साखरे यांचे कार्य उत्कृष्टतेचा आदर्श ठरत असल्याचे ते म्हणाले. शैक्षणिक उत्कृष्टता ही जाती, धर्म, भाषेच्या पलिकडे गेलेली असते. त्यामुळे जगातील विद्यापीठात विद्वान म्हणून बाबासाहेबांचा उल्लेख पाहून भारतीय म्हणून गर्व होते. त्यामुळे समाजातील लोकांनी कुठल्याही क्षेत्रातील गुणवत्ता दलित, बौद्ध म्हणून नाही तर भारतीय म्हणून सिद्ध केली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना डॉ. प्रकाश खरात म्हणाले, बाबासाहेबांच्या विचार प्रेरणेने झपाटलेल्या लोकांनी मुलांच्या शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. त्यामुळे झालेल्या आंबेडकरी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीमुळे आरक्षण विरोध सुरू झाला. आज परिस्थिती अधिक बिकट आहे. त्यामुळे चळवळ अधिक मजबूत होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. डॉ. मालती साखरे यांनीही भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन वाघमारे यांनी केले. संचालन प्रा. पुष्पा घोडके यांनी केले. डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी आभार मानले.