सडकछाप मजनूच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने घेतले विष
By admin | Published: June 27, 2017 01:37 AM2017-06-27T01:37:31+5:302017-06-27T01:37:31+5:30
गेल्या आठ महिन्यांपासून मानसिक त्रास देणाऱ्या सडकछाप मजनूच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षिकेने (वय ३३) विष प्राशन केले.
आठ महिन्यांपासून त्रास : पाठलाग, मेसेज करून केले त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठ महिन्यांपासून मानसिक त्रास देणाऱ्या सडकछाप मजनूच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षिकेने (वय ३३) विष प्राशन केले. तिची प्रकृती गंभीर असून, या घटनेमुळे सक्करदरा परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेच्या पतीकडून तक्रार दाखल होताच पोलिसांनी याप्रकरणी सौरभ प्रकाश ढोले (वय २६) याला अटक केली आहे.
पीडित शिक्षिका आणि आरोपी ढोले एकमेकांशेजारी राहतात. पीडितेचा पती खासगी नोकरी करतो. शेजारी म्हणून सहज बोलचाल करणाऱ्या शिक्षिकेचा गेल्या आठ महिन्यांपासून आरोपी सौरभने पिच्छा पुरविणे सुरू केले आहे. तिचा पाठलाग करणे, सलगी साधण्याचा प्रयत्न करणे, हातवारे करणे, मोबाईलवर वारंवार मेसेज करणे, असे प्रकार सुरू झाल्यामुळे शिक्षिका त्रस्त झाली. तिने हा प्रकार पतीला सांगितल्यानंतर सौरभला शिक्षिकेच्या पतीने एकदा समजावूनही सांगितले. मात्र तो ऐकला नाही. बदनामी होईल, या धाकाने दाम्पत्य गप्प बसल्यामुळे आरोपी निर्ढावला.
त्याचा त्रास दिवसागणिक वाढतच चालल्यामुळे प्रचंड दडपणात आलेल्या शिक्षिकेने रविवारी दुपारी विष घेतले. तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सौरभच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीने (वय ४३) सक्करदरा ठाण्यात नोंदविली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक डेहनकर यांनी आरोपी सौरभ प्रकाश ढोले याच्याविरुद्ध कलम ३५४ (ड) अन्वये गुन्हा नोंदविला.
महिलेची मृत्यूशी झुंज
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विष घेणाऱ्या शिक्षिकेची प्रकृती गंभीर असून, सक्करदऱ्यातील एका खासगी रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. डॉक्टरांकडून परवानगी मिळाली नसल्यामुळे पोलिसांना तिचे बयानही नोंदविता आले नाही. आरोपी सौरभ रिकामटेकडा असून, त्याला अटक करण्यात आली आहे.