कामगारांच्या निवासस्थानाच्या छतासह पायऱ्या काेसळल्या; वेकाेलिच्या चनकापूर वसाहतीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 04:12 PM2022-07-15T16:12:47+5:302022-07-15T16:15:55+5:30
वेकाेलिच्या चनकापूर (ता. सावनेर) वसाहतीतील कामगारांची निवासस्थाने देखभाल व दुरुस्तीअभावी माेडकळीस
खापरखेडा (नागपूर) : वेकाेलिच्या चनकापूर (ता. सावनेर) येथील वसाहतीतील कामगारांची निवासस्थाने देखभाल व दुरुस्तीअभावी माेडकळीस आली आहेत. त्यातच बुधवारी (दि. १३) सकाळी एका निवासस्थानाचे छत व पायऱ्या काेसळल्याने घरातील आठ सदस्य अडकले. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसून, त्या सर्वांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. या एका वाहनाचे नुकसान झाले आहे.
चनकापूर येथे वेकाेलि वसाहतीत असलेल्या प्रत्येक इमारतीत कामगारांची आठ ते १२ कुटुंबे वास्तव्याला आहेत. यातील एका इमारतीच्या वरच्या माळ्यावर सिद्धार्थ वानखेडे व सुनील गाेणे त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला हाेते. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सुरुवातीला त्या दाेघांच्या निवासस्थानांची छते आणि नंतर पायऱ्या काेसळायला सुरुवात झाली. त्यांनी आरडाओरड करताच संपूर्ण इमारत काेसळणार या भीतीने त्या इमारतीत राहणारी संपूर्ण कुटुंबे काही वेळात घराबाहेर पडली.
जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे, पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी, सरपंच पवन धुर्वे यांच्यासह खापरखेडा पाेलीस व खापरखेडा येथील वीज केंद्रातील अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने घटनास्थळ गाठले. या बचाव पथकाने सिद्धार्थ वानखेडे, त्यांच्या पत्नी व दाेन मुले तसेच सुनील गोणे, त्यांची पत्नी आणि त्यांची दाेन मुले अशा एकूण आठ जणांना सुखरूप बाहेर काढले. यात कुणालाही दुखापत झाली नसली तरी सुनील गाेणे यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.
बहुतांश इमारती डिसमेंटल झाेनमध्ये
वेकोलि प्रशासनाने त्यांच्या चनकापूर, सिल्लेवाडा व वलनी येथील वसाहतींमधील इमारतींचे सर्व्हे करून डिसमेंटल झोनमध्ये येणाऱ्या इमारतींची यादी तयार केली. त्या इमारतींमध्ये राहणाऱ्यांना इमारत खाली करण्याबाबत नाेटीस बजावल्या हाेत्या. यात सिद्धार्थ वानखेडे व सुनील गाेणे राहात असलेली इमारतीचा समावेश आहे. घटनेच्या वेळी या इमारतीमध्ये एकूण आठ कुटुंब वास्तव्याला हाेते. नाेटीस प्राप्त हाेऊनही त्यांनी त्यांची निवासस्थाने साेडली नव्हती.
अनेकांनी केला अवैध कब्जा
वेकाेलि प्रशासनाने काही दिवसांपूर्वी त्यांच्या कामगारांच्या तिन्ही वसाहतींचे सर्वेक्षण केले. या वसाहतीतील ८० टक्के लाेकांनी गाळ्यांवर अवैधरीत्या कब्जा केला असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. अवैधरीत्या राहणाऱ्या या नागरिकांना वेकाेलिकडून वीज, पाणी व इतर मूलभूत सुविधा आजही पुरविल्या जात आहेत. या इमारती माेडकळीस आल्याने जीवितहानी हाेण्याची शक्यता बळावली आहे. काेराडी व खापरखेडा वीज केंद्रातील काही कर्मचारी याच वसाहतीतील गाळ्यांमध्ये अवैधरीत्या राहतात. सुनील गाेणे हे त्यापैकी एक हाेत.