स्थायी सिमतीच्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 08:35 PM2020-07-20T20:35:16+5:302020-07-20T20:36:45+5:30
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यात अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या. प्रशासनाने बैठक गांभीर्याने घेतली नाही. कार्यकारी अभियंत्यासह अनेक अधिकारी बैठकीत उपस्थित नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यात अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या. प्रशासनाने बैठक गांभीर्याने घेतली नाही. कार्यकारी अभियंत्यासह अनेक अधिकारी बैठकीत उपस्थित नव्हते. त्यामुळे गैरहजर अधिकाऱ्यांना ‘कारणे द्या’ नोटीस बजावण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी प्रशासनाला दिले.
हॉट मिक्स विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांच्यासह काही विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते. यावर झलके यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर होणाºया प्रस्तावाची तांत्रिक तपासणी, सीएसआर अद्ययावत करणे, तसेच शासकीय अनुदानातून सुचविण्यात आलेली कामे करण्यासाठी सेवानिवृत्त उपअभियंता चंद्रकांत गभणे यांची तांत्रिक सल्लागार म्हणून निवड करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनातर्फे स्थायी समितीकडे मंजुरीसाठी आला होता. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता, हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविला.
मंत्री, आयुक्त सभागृहात बैठका घेत असताना स्थायी समितीचीच बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे का? नियम स्थायी समितीलाच लागू होतो का, असा सवाल पिंटू झलके यांनी पत्रकार परिषदेत केला. आयुक्त तुकाराम मुंढे महापालिका मुख्यालयात विविध बैठकी घेत आहेत. या बैठकींना उपस्थित असलेल्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या तुलनेत स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या कमी आहे. असे असतानाही समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्याचे झलके यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे समिती सदस्य यांच्यासह उपायुक्त व विभाग प्रमुख उपस्थित होते.
स्मार्ट सिटीची वायफाय यंत्रणा अकार्यक्षम
स्मार्ट सिटीची वायफाय यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. स्थायी समितीच्या बैठकीत जबाबदारी या कक्षाकडेच होती. परंतु वाय- फाय यंत्रणा काम करत नव्हती. वारंवार व्यत्यय येत होता. आधी यंत्रणा अद्ययावत करा, त्यानंतरच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्थायी समितीच्या बैठका घ्याव्यात, अशी भूमिका पिंटू झलके यांनी मांडली.
सर्वसाधारण सभा कशी घेणार?
स्थायी समितीच्या बैठकीला ३५ ते ४० पदाधिकारी व अधिकारी उपस्थित असतात. समितीची बैठक घेताना तांत्रिक अडचण येत असेल तर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दोनशे ते सव्वादोनशे लोक उपस्थित असतात. अशा परिस्थितीत सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कशी घेणार, असा सवाल पिंटू झलके यांनी उपस्थित केला.