काँग्रेसमध्ये उभी फूट, नेत्यांची ताटातूट

By admin | Published: May 19, 2017 02:49 AM2017-05-19T02:49:47+5:302017-05-19T02:49:47+5:30

महापालिकेतील विरोधी पक्षनेता व स्वीकृत सदस्याची निवड यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीचा शेवटी स्फोट झाला आहे.

Standing in the Congress, the separation of the leaders | काँग्रेसमध्ये उभी फूट, नेत्यांची ताटातूट

काँग्रेसमध्ये उभी फूट, नेत्यांची ताटातूट

Next

राऊत, चतुर्वेदी, अहमद एकत्र : मुत्तेमवार-ठाकरे विरोधात रणशिंग फुंकले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील विरोधी पक्षनेता व स्वीकृत सदस्याची निवड यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीचा शेवटी स्फोट झाला आहे. काँग्रेसमध्ये आता सरळ सरळ दोन गट पडले आहेत. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद यांनी एकत्र येत माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.
शहर काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून काँग्रेस नेत्यांमध्ये धुसफूस सुरू झाली. महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात समर्थकांचे तिकीट कापल्याच्या कारणावरून बराच राडा झाला. या सर्व वादाचे पडसाद महापालिकेच्या निवडणुकीत उमटले. पुढे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्याची घटना घडली. निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पराभवानंतरही विरोधी पक्षनेते पदावरून गटबाजीने दंड थोपटले. चतुर्वेदी गटाने सुरुवातीला प्रफुल्ल गुडधे व नंतर तानाजी वनवे यांचे नाव समोर केले. तर मुत्तेमवार-ठाकरे यांनी संजय महाकाळकर यांच्यासाठी जोर लावला. महाकाळकर विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांना हटविण्यासाठी विरोधी गटाने दिल्लीवारी करीत अ.भा. काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुंबईत बैठक घेत विकास ठाकरे व प्रफुल्ल गुडधे यांना गटबाजी मिटविण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यानंतरही मतभेद मिटण्याऐवजी तीव्र झाले व काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचे नाव स्वीकृत सदस्यासाठी दिले जाऊ नये यासाठी चतुर्वेदी गटाकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी प्रगती भवनात बैठक घेत तानाजी वनवे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आल्याचा ठराव संमत केला.
यानंतर १७ नगरसेवकांच्या स्वाक्षरी असलेला संबंधित ठराव विभागीय आयुक्तांना भेटून सादर करण्यात आला व वनवे यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्याची मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी या स्वाक्षरीवर आक्षेप नोंदविल्यानंततर महापालिकेचे सचिव हरीश दुबे यांच्याकडे ओळख परेडसाठी १७ पैकी १६ नगरसेवकांना हजर करण्यात चतुर्वेदी-राऊत-अहमद गटाला यश आले.
विरोधी पक्षनेत्याचा विषय वादग्रस्त ठरला म्हणजे गुरुवारी स्वीकृत सदस्याच्या अर्जावर विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांची स्वाक्षरी चालणार नाही व विकास ठाकरे यांचा स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत येण्याचा मार्गच बंद करण्याची रणनीती या गटाने आखली होती.
ही खेळी यशस्वी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले तर ठाकरे यांनी खेळी उलटविण्यासाठी जोर लावला. विभागीय आयुक्तांनी १७ व्या सदस्यांची ओळखपरेड बाकी असल्याचे कारण देत निर्णय प्रलंबित ठेवला. त्यामुळे महाकाळकर विरोधी पक्षनेतेपदी कायम राहिले व त्यांच्या स्वाक्षरीने ठाकरे यांचा अर्ज भरला गेला.
यानंतरही चतुर्वेदी गटाकडून किशोर जिचकार यांचा अर्ज भरण्यात आला. आम्ही ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत स्वीकृती देणार नाही, असा इशाराच या गटाने दिला.
एकूणच घडामोडी पाहता काँग्रेसचे दोन्ही गट आता एकमेकांना शांत बसू देणार नाहीत, ही गटबाजी आणखी आक्रमक स्वरूप घेईल, हे स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार?
लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत २७ मे रोजी भाजप लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र उभी फूट पडली आहे. गटबाजीची तीव्रता वाढल्याने काँग्रेसच्या मतदारांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. हे असेच सुरू राहिले तर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपशी मुकाबला करणे तर दूर पण काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Web Title: Standing in the Congress, the separation of the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.