राष्ट्रगिताकरिता उभे राहणे केव्हाही योग्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 09:44 PM2017-11-22T21:44:10+5:302017-11-22T21:45:01+5:30
आॅनलाईन लोकमत
नागपूर: चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत जन -गण- मन सुरू झाल्यानंतर देशभक्तीचे दर्शन घडविण्यासाठी उभे राहणे आवश्यक नाही, ही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी अत्यंत चुकीची असून राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभे राहणे केव्हाही योग्यच असल्याचे मत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
राज्यात आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख यांनी मंत्री म्हणून पुढाकार घेऊन प्रत्येक नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत ठेवण्यासाठी व भारताच्या राष्ट्रगीताचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर येथील सिनेमागृहातून २६ जानेवारी २००४ पासुन राष्ट्रगीत सुरू करण्याचा शुभारंभ केला होता. तेव्हापासुन संपूर्ण राज्यात प्रत्येक चित्रपटगृहात हा नियम काटेकोरपणे पाळला जात होता. चित्रपट पाहायला येणारे प्रेक्षकसुध्दा आनंदाने व देशप्रेमाच्या भावनेने राष्ट्रगीत जन -गण- मन सुरू झाल्यानंतर सन्मानासाठी उभे राहत होते. यात सर्व समुदायाचे आबालवृध्द नागरिक, तरुण, तरुणी व बालगोपालांचा समावेश होता.
असे असताना सुध्दा सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात राष्ट्रगीत जन-गण- मन सुरू झाल्यानंतर देशभक्तीचे दर्शन घडविण्यासाठी उभे राहणे आवश्यक नसल्याची टिप्पणी करणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.