एक्स-रे साठी खासदारांना केले स्टुलवर उभे
By admin | Published: January 28, 2017 02:03 AM2017-01-28T02:03:18+5:302017-01-28T02:03:18+5:30
गुडघ्याच्या दुखण्यावर उपचारासाठी आलेल्या एका खासदारांना मोडकळीस आलेल्या टेबलवर उभे करून ‘एक्स-रे’ करण्यात आला.
मेडिकलमधील प्रकार : दोन एक्स-रे मशीन बंद
नागपूर : गुडघ्याच्या दुखण्यावर उपचारासाठी आलेल्या एका खासदारांना मोडकळीस आलेल्या टेबलवर उभे करून ‘एक्स-रे’ करण्यात आला. मेडिकलच्या एक्स-रे विभागाच्या या प्रकारामुळे खासदारांनी आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे, गेल्या एक महिन्यापासून दोन एक्स-रे मशीन बंद असल्याचे लक्षात येताच त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवरही धरले.
१४०० खाटांच्या या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु सोयी असून त्याला कार्यान्वित ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने रुग्णसेवेवर याचा प्रभाव पडत आहे. मेडिकलच्या क्ष-किरण विभागात चार एक्स-रे मशीन आहेत. यातील एक मशीन भंगारात काढण्यात आली आहे. तर मागील महिन्यात दोन मशीनची ट्यूब नादुरुस्त झाल्याने त्या बंद पडल्या आहेत. केवळ एकच मशीन सुरू आहे. परिणामी, एक्स-रे साठी रुग्णांवर दोन ते तीन तासांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. यातच सोमवारी खासदार कृपाल तुमाने गुडघे दुखण्याच्या उपचारासाठी अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. सजल मित्रा यांच्याकडे आले असता त्यांना विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी सांगितले, डॉ. मित्रा यांनी तपासून एक्स-रे विभागात पाठविले. परंतु या विभागातील कर्मचाऱ्याने गुडघ्याच्या ‘एक्स-रे’साठी मोडकळीस आलेल्या स्टूलवर उभे केले. एक्स-रे झाल्यावर या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, मशीन एवढ्या खाली जात नसल्याने रुग्णाला स्टुलवर उभे केले जात असल्याचे उत्तर मिळाले. बाहेर रुग्णांच्या गर्दीविषयी विचारले, असता गेल्या महिन्याभरपासून तीनपैकी एकच मशीन सुरू असल्याचे सांगण्यात आले. एकूणच या प्रकाराची माहिती वैद्यकीय अधीक्षकांना दिली व तत्काळ बंद मशीन सुरू करण्याच्या सूचना दिल्याचेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)