महापालिका सभेत ‘स्टार वार’
By admin | Published: January 20, 2016 03:49 AM2016-01-20T03:49:38+5:302016-01-20T03:49:38+5:30
स्टारबस व्यवस्थापनाला फायदा व्हावा, या हेतूने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त व अधिकाऱ्यांनी स्टार बस
निर्देशानंतरही कारवाई नाही : व्यवस्थापकाला अभय असल्याचा आरोप
नागपूर : स्टारबस व्यवस्थापनाला फायदा व्हावा, या हेतूने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त व अधिकाऱ्यांनी स्टार बस व्यवस्थापनाशी क रार केल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले होते. त्यामुळे तीन वर्षापूर्वी तत्कालीन महापौर अनिल सोले यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. परंतु या निर्देशाची अद्याप अंमलबाजवणी झालेली नाही. प्रशासनात स्टारबस संचालकाला वाचविण्यासाठी काही लोक सक्रिय आहेत. वारंवार मागणी करूनही या संदर्भात कारवाई होत नसेल तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी मंगळवारी दिला. महापालिकेच्या विशेष सभेत यावर वादळी चर्चा झाल्याने पुन्हा एकदा ‘स्टार वॉर’ बघायला मिळाले. (सविस्तर वृत्त/ २)
जेट पॅच कामाची चौकशी
डांबरीकरण व दुरुस्तीसाठी प्रस्तावित असलेल्या रस्त्यावर जेट पॅच मशीनद्वारे खड्डे बुजवून कामाचे बिल उचलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ठाकरे यांनी केली. या कंपनीसोबत तीन वर्षांसाठी करार केला होता. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना खरोखरच या मशीनची गरज आहे का, असा सवाल त्यांनी केला. रस्त्याचे कामाला मंजुरी असलेल्या मार्गावर पॅच मारण्याचे काम होत असेल तर अशा प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पाण्याचे चौपट बिल
घरात चार सदस्य, पाण्याचा मोजकाच वापर असूनही पाण्याचे बिल अडीच ते तीन हजार रुपये येत आहे. सर्वसामान्याना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे किशोर डोरले यांनी निदर्शनास आणले. २०१३ मध्ये ४८ युनीटचे ४०० ते ४५० रुपये बिल येत होते. आता ते पाच ते सहापटीने वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यावर महापौरांनी पाणी बिलासंदर्भातील तक्रारी तपासण्याचे निर्देश दिले. रवींद्र डोळस यांनीही पाणी बिल अधिक येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
सभागृहातील महत्त्वाचे निर्णय असे
४नाल्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणासंदर्भात १५ दिवसात अभ्यास करून अहवाल आयुक्तांना सादर करा. तसेच अतिक्रमण कारवाई करण्याचे महापौरांचे निर्देश
४रामदासपेठ येथील महापालिका शाळेत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने हर्ष ललके या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यातील दोषींच्या विरोधात आठवडाभरात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धर्तीवर महापालिकेत विशेष निधीची तरतूद करण्याचा विचार मांडण्यात आला.
४शहरालगतच्या भागात स्वच्छता करण्यासाठी रिक्त असलेली सफाई कर्मचाऱ्यांची ४ हजार पदे भरण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
४कृषी विद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमणाला महापालिका प्रशासनाकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी केला.
४निविदा न काढताचा चांभार नाल्याच्या स्वच्छतेवर २० लाखांचा खर्च करण्यात आला. संदीप सहारे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाची आठडाभरात चौकशी करून सदस्याला लेखी स्वरुपात माहिती देण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
४स्थायी समितीच्या आदेशानुसार शहरातील कचरा उचलण्यातील अनियमितेची फेरचौकशी उपयुक्त संजय काकडे यांनी केली आहे. याबाबतचा अहवाल दोन दिवसात सादर केला जाणार आहे.
४कचरा उचलण्याच्या प्रकरणात झोन निरीक्षक व झोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच कचऱ्याबाबत तक्रार करावयाची झाल्यास महापालिकेने टोल फ्री क्रमांक सुरू करावा असे निर्देश महापौरांनी दिले.