स्टारबसचे स्टेअरि ंग कुणाच्या हातात ?
By admin | Published: August 24, 2015 02:26 AM2015-08-24T02:26:01+5:302015-08-24T02:26:01+5:30
शहरातील ‘स्टारबस’बाबत नेहमीच काही ना काही ओरड सुरू असते. बसेसची योग्य देखभाल होत नसल्याने एकेक बस जीर्ण होत चालली असून ....
चालकाचा परवाना अपडेट नाही : अपघात विम्याच्या दाव्याद्वारे उघडकीस आला प्रकार
लोकमत विशेष
आनंद डेकाटे नागपूर
शहरातील ‘स्टारबस’बाबत नेहमीच काही ना काही ओरड सुरू असते. बसेसची योग्य देखभाल होत नसल्याने एकेक बस जीर्ण होत चालली असून या बससेवेमुळे नागरिकांना फायदा होण्याऐवजी त्रासच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. यातच आता ‘एक्सपायरी डेट’ परवानाचालक स्टारबस चालवित असल्याचे धक्कादायक प्रकरण अपघात विम्याच्या दाव्याद्वारे उघडकीस आले आहे.
वायुसेना नगर क्वॉर्टर येथे राहणारी रवीना सुरेशराव भाजीपाले ही १८ वर्षीय तरुणी एलएडी कॉलेज शंकरनगर येथे बीए प्रथम वर्षाला शिकत होती. १२ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कॉलेज आटोपून घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत शंकरनगर चौकात उभी होती. दरम्यान एम.एच. ३१- सीए-६०८२ या क्रमांकाची स्टारबस आली. रवीना बसमध्ये चढली. बसमध्ये अतिशय गर्दी असल्याने रवीना बसच्या दरवाजाजवळच उभी होती. बसचालक बस भरधाव चालवित होता. ३.१५ वाजताच्या दरम्यान रविनगरकडे जात असताना स्टारबसचा चालक विलास मकेश्वर याने अतिशय निष्काळजीपणे जोरात ब्रेक लावले. त्यामुळे रवीना बसच्या दरवाजातून बाहेर फेकल्या गेली.
ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला चांगलाच मार बसला. बसमधील प्रवाशांनी चालकाला जाब विचारा. परंतु चालक अतिशय असभ्यपणे वागला. आपली काही चूक नाही, असे सांगून रवीनाला जखमी अवस्थेत सोडून मदत न करता निघून गेला. रस्त्यावरील काही लोकांच्या मदतीने रवीनाला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला.
रवीनाचा भाऊ अश्वीन याने यासंदर्भात तक्रार दाखल केली. अंबाझरी पोलीस ठाण्यात महानगरपालिकेचा वाहतूक विभाग, वाहतूक अभियंता आणि द न्यू इंडिया इन्शोरन्स कंपनी लि. यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयात आले. यसंदर्भात विमा कंपनीने आपल्या वकिलामार्फत या प्रकरणाची सत्यता पडताळून घेण्याचा प्रयत्न केला. अॅड. यशवंत मेश्राम यांनी या प्रकरणाची आपल्या स्तरावर चौकशी सुरू केली. एकेक कागदपत्र ते गोळा करीत होते.
याअंतर्गत ते बसचालकालाही भेटले. कागदोपत्री कारवाईसाठी त्यांनी त्याला बसचालकाचा परवाना मागितला.
परंतु त्याने परवाना देण्यासाठी टाळाटाळ केली. तब्ब्ल सहा महिने प्रयत्न करूनही परवाना मिळत नसल्याने मेश्राम यांनी प्रादेशिक वाहतूक विभागातून चालकाच्या परवानासंबधीची माहिती काढली. तेव्हा चालक मकेश्वर याचे ड्रायव्हिंग लायसन्स ८८/७०६१/नाग हे २३ एप्रिल १९८८ रोजी वितरित करण्यात आले होते.
त्या परवान्याची मुदत ८ जुलै २००८ रोजी संपली. तेव्हापासून परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही. परवाना लॅप्स झाला आहे. यासंदर्भात त्यांनी विमा कंपनीला आपला अहवाल सादर केला आहे.