जात वैधता प्रमाणपत्राच्या वाटपाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:04 PM2018-04-13T23:04:05+5:302018-04-13T23:04:19+5:30
बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठी धावपळ उडते. कार्यालयात विद्यार्थ्यांची अचानक गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ऐन प्रवेशाच्या तोंडावर ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शुक्रवारपासून जात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठी धावपळ उडते. कार्यालयात विद्यार्थ्यांची अचानक गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ऐन प्रवेशाच्या तोंडावर ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शुक्रवारपासून जात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूरचे उपायुक्त व सदस्य आर. डी. आत्राम यांच्या पुढाकाराने ७०० विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, ओबीसी व एसबीसी जातीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महसूल उपायुक्त के. एन. के. राव, सहाय्यक आयुक्त विजय वाकुडकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, हंसराज गोहते, गोपाल वानखेडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आर.डी. आत्राम म्हणाले की, दरवर्षी नागपूर समितीकडून २० हजाराच्या जवळपास जात पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते. यात १२ हजार प्रमाणपत्र बारावीच्या विद्यार्थ्यांचे असते. तर पाच हजाराच्या जवळपास अभियांत्रिकीला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे असते. तर ३००० च्या जवळपास नोकरी व निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते. यावर्षी समितीकडे २० ते २२ हजाराच्या जवळपास अर्ज आले आहे. काही प्रकरणात असलेल्या त्रुटी वगळता ८० टक्के प्रमाणपत्राचे काम झाले आहे. सामाजिक समता सप्ताहाच्या माध्यमातून आज ७०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. दरवर्षी निकालानंतर विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता, यावर्षी परीक्षा संपल्यानंतरच प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.