‘आपली बस’ सामान्यांच्या सेवेत सुरू करा : डेपोत पडून होताहेत भंगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:55 AM2020-09-27T00:55:37+5:302020-09-27T00:57:59+5:30
लॉकडाऊन लागल्यानंतर शहरात धावणारी ‘आपली बस’ डेपोमध्येच पडून आहे. डेपोमध्ये पडून असल्याने तिची अवस्था भंगारासारखी झाली आहे. शासनाने अनलॉक घोषित केल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आपली बस अजूनही उभीच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन लागल्यानंतर शहरात धावणारी ‘आपली बस’ डेपोमध्येच पडून आहे. डेपोमध्ये पडून असल्याने तिची अवस्था भंगारासारखी झाली आहे. शासनाने अनलॉक घोषित केल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आपली बस अजूनही उभीच आहे. सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी आपली बस सेवा सुरू करा, अशी मागणी युवा सेनेतर्फे मनपाचे उपायुक्त राम जोशी यांना करण्यात आली. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील डेपोमध्ये पडलेल्या ‘आपली बस’च्या अवस्थेची छायाचित्रे गोळा केली. बसच्या दुरवस्थेची माहिती उपायुक्त राम जोशी यांना दिली. तसेच आपली बस सेवा सामान्य नागरिकांसाठी किती महत्त्वाची आहे, हे पटवून दिले. आठ ते दहा हजार रुपये कमविणाऱ्यांसाठी खिशाला परवडणारी ही सेवा आहे. एकीकडे महाराष्ट्र शासनाने एस.टी.ची सेवा सुरू केली. त्याच धर्तीवर मनपा प्रशासनानेही आपली बस सुरू करावी. आपली बस सुरू केल्यास बसचा रखरखाव चांगला राहील. यावेळी संघटनेने बसला चिखलात सडत ठेवणाऱ्या कंत्राटदारावर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. युवा सेनेचे उत्तर नागपूर युवा अधिकारी गणेश सोलंके यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी संदीप पटेल, नीलेश तिघरे, छगन सोनुने, शशिकांत ठाकरे, प्रशांत इलमकर, सलमान खान, अनुराग लारोकर, लेखांक टेंभुर्णे आदी उपस्थित होते.