कामठी येथे काेविड केअर सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:09 AM2021-03-31T04:09:55+5:302021-03-31T04:09:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांना वेळीच याेग्य उपचार मिळत नसल्याने मृत्यूचे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांना वेळीच याेग्य उपचार मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात काेविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी तहसीलदार अरविंद हिंगे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कामठी तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कामठी शहरातील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्याची काेणतीही साेय नसल्याने त्यांना नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात पाठविले जाते. तिथे जिल्हाभरातील रुग्ण येत असल्याने तसेच खाटांची कमतरता भासत असल्याने रुग्णांची गैरसाेय हाेते. प्रसंगी रुग्णांना खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करावे लागते. खासगी हाॅस्पिटलमध्ये काेराेना उपचाराचा खर्च अवाढव्य असल्याने, ताे सामान्य व गरीब नागरिकांना आर्थिकदृष्ट्या झेपणारा नाही. त्यामुळे ही समस्या साेडविण्यासाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात काेविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणीही नागरिकांनी या निवेदनात केली आहे.
तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या अनुपस्थितील नायब तहसीलदार आर.टी.उके यांनी निवेदन स्वीकारले. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आर.टी.उके यांनी शिष्टमंडळाला दिली. शिष्टमंडळात कामठी नगरपालिकेच्या गटनेता सुषमा सिलाम, उज्ज्वल रायबोले, राज हडोती, रमेश वैद्य, सुनील खानवानी, मंगेश यादव, दयाल मेहता, विक्की बोंबले, मनीष यादव, सतीश जयस्वाल यांचा समावेश हाेता.