काेविड रुग्णालय सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:08 AM2021-03-22T04:08:51+5:302021-03-22T04:08:51+5:30
काटाेल : काटाेल शहर व तालुक्यात काेराेना रुग्णसंख्येत वाढ हाेत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना प्रसंगी नागपूर शहरातील ...
काटाेल : काटाेल शहर व तालुक्यात काेराेना रुग्णसंख्येत वाढ हाेत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना प्रसंगी नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये पाठवावे लागते. सामान्य नागरिकांना खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने काटाेल शहरात काेविड रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी शहरातील ज्येष्ठ नागरिक मंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्या माध्यमातून पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
काटाेल शहराची लाेकसंख्या ५२ हजारांपेक्षा अधिक आहे. दुसऱ्या लाटेत काटाेल शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांमध्ये माेठी वाढ हाेत आहे. यातील गंभीर रुग्णांना उपचारासाठी नागपूरला पाठवावे लागते. त्यांना नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात भरती करवून न घेतल्यास खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतात. त्यासाठी त्यांना किमान दाेन ते तीन लाख रुपये खर्च करावे लागतात. हा खर्च सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यांच्यावर उपचाराची साेय व्हावी म्हणून काटाेल शहरात काेविड रुग्णालय सुरू करावे, अशी मागणीही ज्येष्ठ नागरिकांनी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात ज्येष्ठ नागरिक मंडळ काटोलचे अध्यक्ष वामन खंडाळ, सचिव गजानन भोयर, सहसचिव अशोक काकडे, सदस्य रमेश तिजारे, भीमराव ढोले, मोतीराम वंजारी, पंजाब दुधाने यांचा समावेश हाेता.