छुप्या पद्धतीने डान्स बार सुरूच
By admin | Published: October 16, 2015 03:14 AM2015-10-16T03:14:30+5:302015-10-16T03:14:30+5:30
सर्वच बारमध्ये त्यावेळी मद्यशौकिनांसोबतच आंबटशौकिनांचीही कमालीची गर्दी असायची. राज्य सरकारने २००५मध्ये डान्स बारवर बंदी घातली.
नागपुरातही ‘डान्स बार’चे मनसुबे
नागपूर : सर्वच बारमध्ये त्यावेळी मद्यशौकिनांसोबतच आंबटशौकिनांचीही कमालीची गर्दी असायची. राज्य सरकारने २००५मध्ये डान्स बारवर बंदी घातली. बरीच आदळआपट होऊनही तत्कालीन दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी बारमालक, डान्सर्स आणि त्यांच्या बाजूने ठाकलेल्यांचे प्रयत्न हाणून पाडत ही बंदी कायम ठेवली. बंदीच्या तडाख्यात नागपुरातील शेरे पंजाब आणि सोनाच्या डान्स बारमालकांनी बार बंदच केले नाही तर ती जागाही विकून टाकली. बंद पडलेल्या वर्धा मार्गावरील पार्क इन डान्स बारची जागा मिहानमध्ये गेली. उर्वरित चार पैकी एमआयडीसीतील ग्रेट मराठा गेल्यावर्षी विकले गेले. माहितीनुसार, त्याचे लायसेन्सही पोलिसांकडे जमा झाल्याचे कळते. त्यामुळे डान्स बार सुरू झाले तर त्याचा फायदा लाहोरी, गोल्डन स्पून आणि निडोजलाच मिळणार आहे.
विशेष म्हणजे, राज्य सरकारने बंदी घातली असली तरी उपराजधानीत आणि आजूबाजूच्या परिसरात त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरुवातीपासूनच झाली नाही. आॅर्केस्ट्राच्या नावाखाली येथे अनेक ठिकाणी डान्सबार बिनधास्त सुरू आहेत. काही तासातच लाखो रुपयांची उधळण होत असल्यामुळे येथील तसेच जिल्ह्यातील बारमालक मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, पटियाला, चेन्नई, रायपूर, बिलासपूरसह अनेक महानगरातून डान्सर्सना नागपुरात बोलवतात.
त्यांच्याकडून विशिष्ट ग्राहकांसाठी उशिरा रात्री ‘डान्स’ करवून घेतला जातो. बुकी, जुगार अड्डा, क्लब चालविणारे, अवैध धंद्यात गुंतलेले, धनिकबाळ, आंबटशौकिन कारभारी, यांच्यासाठीच डान्सबार ‘ओपन’ असतात. बारमालक एकाच रात्री लाखोंची हेराफेरी करतात.
डान्सर्सना एका ‘नाईट शो’साठी विशिष्ट रक्कम दिली जाते. ती येण्याजाण्याच्या खर्चापासून किमान ५० हजार तर कमाल २ लाखापर्यंत असते. शहराच्या हृदयस्थळासह नंदनवन, एमआयडीसी, हिंगणा, सदर, सेंट्रल एव्हेन्यू, सोनेगाव, प्रतापनगर, कामठी, बुटीबोरीच्या अलीकडच्या परिसरासह अन्य काही भागात छुप्यापद्धतीने डान्सबार आतापर्यंत (अधूनमधून) सुरू होते.