कळमेश्वर येथे तातडीने डीसीएच सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:08 AM2021-04-22T04:08:52+5:302021-04-22T04:08:52+5:30
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाने युद्धस्तरावर काम करुन डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) तयार करण्याच्या कामाला गती ...
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाने युद्धस्तरावर काम करुन डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) तयार करण्याच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना खा. कृपाल तुमाने यांनी केल्या. तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. तालुक्यात एकही डीसीएच किंवा डीसीएचसी नसल्याने रुग्णांना नागपूर शिवाय पर्याय नाही. त्यामुळे कळमेश्वर येथे डीसीएच निर्माण करावे यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव द्यावा, तो मान्य करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही तुमाने यांनी दिली. त्यांनी तालुक्यातील व कळमेश्वर शहरातील विलगीकरण कक्षाविषयी माहिती जाणून घेतली व तिथे असलेल्या असुविधा दूर करण्याचे निर्देश दिले. राज्य सरकारने जारी केल्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे प्रशासनाने काटेकोरपणे पालन करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा आवाहन त्यांनी केले. यासाठी कन्टेन्मेंट झोन व लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला. लोकांमध्ये असलेली लसीकरणाची भीती दूर करावी यासाठी सर्व पक्षीय लोकांची मदत घ्यावी, लसीकरणासाठी जाहिरातीवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी व कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णावर उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी मांडल्या. कोविड रुग्णांवर उपचारासाठी शहरातील मंगल कार्यालय आणि तत्सम जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी विलगीकरण कक्ष उघडता येईल यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे. खासगी डॉक्टरांनी एकत्र येत डीसीएच किंवा डीसीएचसी सुरु करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. बैठकीला उपविभागीय अधिकारी अतुल म्हैत्रे, नायब तहसीलदार सुजाता गावंडे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, ठाणेदार आसिफ राजा शेख, गटविकास अधिकारी महेश्वर डोंगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपा कुलकर्णी, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रीती इंगळे आदी उपस्थित होते.