'खाऊ गल्ली' तातडीने सुरू करा! महापौरांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 08:33 PM2019-12-07T20:33:14+5:302019-12-07T21:25:57+5:30
शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधीसागर तलावाच्या काठावरील ‘खाऊ गल्ली’ची दुरुस्ती करून ती तातडीने नागरिकांसाठी सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधीसागर तलावाच्या काठावरील ‘खाऊ गल्ली’ची दुरुस्ती करून ती तातडीने नागरिकांसाठी सुरू करा, असे निर्देश महापौरसंदीप जोशी यांनी शनिवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
जोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राबविलेल्या ‘वॉक अॅण्ड टॉक विथ मेयर’ आणि ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’ या उपक्रमादरम्यान गांधीसागर लगतची खाऊ गल्ली सुरू करण्याची मागणी नागरिकांनी के ली होती. गांधीसागर तलावाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तेथे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढल्याचे नागरिकांनी त्यांच्या लक्षात आणले. याची दखल घेत महापौरांनी यांनी १ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर आयोजित ब्रेकफास्ट विथ मेयर या कार्यक्रमात १ जानेवारी रोजी खाऊ गल्ली नागरिकांसाठी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी खाऊ गल्लीचा निरीक्षण दौरा केला. खाऊ गल्लीतील पार्किं गमधील फ्लोरिंग तुटलेले आहे. दुरुस्तीची लघु निविदा काढून सात दिवसाच्या आत काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निरीक्षणादरम्यान उपस्थित असलेल्या नगरसेवकांच्या निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन त्यातून आय ब्लॉक दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जोशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
खाऊ गल्ली पार्किं गस्थळी ठळक अक्षरात फलक लावणे, तेथे येणाऱ्या नागरिकांसाठी वॉटर एटीएम सुरू करणे, परिसरातील सर्व पथदिवे तातडीने सुरू करणे, तलावाच्या रेलिंगला लागून असलेली झुडुपे, गवत काढण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. परिसरातील दैनंदिन साफसफाईची जबाबदारी प्रभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली. निर्देशाची अंमलबजावणी तातडीने होते की नाही ह्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सहायक आयुक्त किरण बागडे आणि उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांच्यावर निश्चित करण्यात आली. या कार्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही महापौरांनी यावेळी दिला. यावेळी क्रीडा सभापती प्रमोद चिखले, नगरसेवक हर्षला साबळे, विजय चुटेले आदी उपस्थित होते.