गोवंश गोवर्धन सेवा केंद्र सुरू करा; २५ लाखापर्यंत अनुदान घ्या; पात्रताधारकांना संधी
By गणेश हुड | Published: July 8, 2023 05:15 PM2023-07-08T17:15:17+5:302023-07-08T17:18:15+5:30
राज्यातील ३२४ तालुक्यात योजना राबविणार
नागपूर : दुग्धोत्पादन, शेती काम, पशु-पैदाशीस, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त असलेल्या व नसलेल्या गायी, वळू, बैल तसेच् वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणाऱ्या गोशाळा,सेवा केंद्रांसाठी राज्य शासन गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही नवीन योजना राबवणार आहे. या योजनेंतर्गत १५ ते २५ लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. राज्यातील ३२४ तालुक्यात ही योजना राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या गोशाळांना पशुधनाच्या संख्येनुसार १५ ते २४ लाखापर्यंतचे अनुदान मिळणार आहे. सुधारित गोवंश गोवर्धन सेवा केंद्र या योजनेसाठी पात्र गोशाळांकडून नव्याने अर्ज मागविण्यात आले आहेत. या अनुदानाच्या पात्रतेसाठी अटी व शर्ती शासनाने ठारविल्या आहेत. त्यानुसार पात्र गोशाळांनी त्यांच्या तालुक्यातील पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग येथे १९ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावे. व अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय किंवा तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अथवा पशुधन विकास अधिकारी (वि) याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. नितीन फुके यांनी केले आहे.
लाभार्थी निवडीसाठी अटी व शर्ती
- संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी.
- संस्थेचे मागील तीन वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असावे.
-संस्थेला गोवंश संगोपनाचा कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असावा.
- केंद्रावरील पशुधनास आवश्यक वैरण , चारा उत्पादनासाठी व पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वतःच्या मालकीची अथवा ३० वर्षांच्या नोंदणीकृत भाडेपट्ट्यावर किमान ५ एकर जमीन असावी,
- संस्थेकडे एअनुदानाच्या कमीत कमी १० टक्के खेळते भागभांडवल असावे.
- आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत करारनामा करणे बंधनकारक राहील.
- संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे.