हॉटेल, ढाबे, मंगल कार्यालय सुरू करा, पण प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:17+5:302021-06-09T04:11:17+5:30
काटोल : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात काटोल ...
काटोल : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात काटोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तालुक्यातील हॉटेल, ढाबे, मंगल कार्यालय, बीअर बार मालकांची बैठक झाली. तीत अनलॉकच्या प्रक्रियेत कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. यासोबतच संबंधित आस्थापना सील केल्या जाईल, असे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीला तहसीलदार अजय चरडे, गटविकास अधिकारी संजय पाटील, काटोलचे ठाणेदार महादेव आचरेकर, कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार आदी उपस्थित होते. कोणत्याही मंगल कार्यालयात १०० लोकापेक्षा अधिक लोकांची गर्दी झाल्यास आणि नियमाचा भंग झाल्यास पहिल्यांदा दंड होईल. यासोबतच परत उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय सील करण्यात येईल, असे तहसीलदार अजय चरडे व ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी सांगितले. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी असून, हॉटेल, बीअर बार, मंगल कार्यालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी आणि लसीकरण ही प्रक्रिया सक्तीने राबविण्यावर भर देण्यावरही या बैठकीत चर्चा झाली.