माैदा-धानला-रामटेक बससेवा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:09 AM2021-01-23T04:09:40+5:302021-01-23T04:09:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने मार्च-२०२० पासून काही काळासाठी लाॅकडाऊन जाहीर केले. यात एसटी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने मार्च-२०२० पासून काही काळासाठी लाॅकडाऊन जाहीर केले. यात एसटी बसेसही बंद करण्यात आल्या. राज्य शासनाने महिनाभरापूर्वी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत; मात्र बससेवा सुरू करण्यात न असल्याने ग्रामीण भागातील शेकडाे विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी व घरी परत येण्यासाठी विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने माैदा-धानला-रामटेक ही बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी परशुराम मते यांच्यासह विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे.
राज्यातील काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळांमध्ये काेराेना प्रतिबंधकयाेग्य उपाययाेजना करण्यात आल्याची खात्री पटताच शाळा सुरू करण्यात आल्या. माैदा-धानला-रामटेक मार्गावरील गावांमधील शेकडाे विद्यार्थी राेज बसने माैदा व रामटेक शहरातील शाळांमध्ये जातात. त्यासाठी ते बसेसने नियमित प्रवास करतात. पूर्वी रामटेक आगाराची रामटेक-अडेगाव ही बस अडेगाव येथे मुक्कामी असायची.
काही विद्यार्थी बसने नागपूर व भंडारा येथे शिकायला जायचे. बससेवा बंद असल्याने या विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्यांनी माैदा, रामटेक, नागपूर व भंडारा येथील कार्यालयीन व इतर कामे करण्यास अडचणी येत आहेत. ही बस सकाळी ६ वाजता माैदा व रामटेकच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करायची. या बसने माैदा तालुक्यातील अडेगाव, काेदामेंढी, खंडाळा, धानला, चिचाेली, बाेरगाव, माराेडी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी माैदा येथे अन्य गावांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी रामटेक येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये जायचे आणि सायंकाळी घरी परत यायचे. काेराेना संक्रमणामुळे बंद करण्यात आलेली ही बससेवा अद्यापही सुरू करण्यात न आल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत जाण्यास व घरी परत येण्यास अडचणी येत असल्याने ही बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी परशुराम मते यांच्यासह विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
...
खासगी वाहनांचा अभाव
या मार्गावर बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना राेज खासगी वाहनांचा आधार घेत शाळेत जावे लागते. या मार्गावर खासगी प्रवासी वाहने फारसी नसल्याने माेठी गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे काही विद्यार्थी सायकलने तर काही माेटरसायकलींनी शाळेत जातात. ज्यांच्याकडे वाहने नाहीत, त्यांना शाळेत जाण्यासाठी व शाळेत घरी परत येण्यासाठी नाना अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. प्रसंगी विद्यार्थिनींना लिफ्ट मागावी लागत असून, ते धाेकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.