मानकापूर रेल्वे फाटक सुरू करा

By admin | Published: January 12, 2015 01:01 AM2015-01-12T01:01:06+5:302015-01-12T01:01:06+5:30

राष्ट्रीय महामार्गावरील मानकापूर रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाखालील रेल्वे फाटक क्रमांक २९४ येत्या २४ तासात सुरू करा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी

Start the Manakpur railway gate | मानकापूर रेल्वे फाटक सुरू करा

मानकापूर रेल्वे फाटक सुरू करा

Next

नागरिकांच्या आंदोलनाला यश : गडकरींचे अधिकाऱ्यांना निर्देश
नागपूर : राष्ट्रीय महामार्गावरील मानकापूर रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाखालील रेल्वे फाटक क्रमांक २९४ येत्या २४ तासात सुरू करा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सूद आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंग यांना दिले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रा. अनिल सोले, चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपा पक्षनेते दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर, भाजपा शहर अध्यक्ष गिरीश व्यास, संजय बंगाले प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने मानकापूर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. परंतु पूल झाल्यापासून येथील रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे फाटकाच्या पलीकडील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फाटकाच्या पलीकडील परिसरात जवळपास ३० हजारावर नागरिक राहतात. या परिसरात झिंगाबाई टाकळी व मानकापूर हे मुख्य बाजाराचे ठिकाण असून, पलीकडील नागरिकांना लहानसहान गोष्टीसाठी अलीकडे यावे लागते.
मानकापूर स्मशानभूमी सुद्धा फाटकाच्या अलीकडे आहे. या परिसरातील नागरिकांना कुठल्याही गोष्टीसाठी झिंगाबाई टाकळी किंवा मानकापूरला यायचे असेल तर किमान दोन किलोमीटरचा फेरा मारून यावे लागते. त्यामुळे पलीकडील नागरिकांना अलीकडे येण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी लावून धरली होती. तसेच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रेल्वे फाटक सुरू ठेवावे, अशी मागणीसुद्धा केली होती. परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्यांची मागणी धुडकावून लावली.
मानकापूर रेल्वे क्रॉसिंग आंदोलन समितीची स्थापना केली आणि या समितीमार्फत गेल्या चार महिन्यांपासून येथील शेकडो महिला-पुरुष यांचे साखळी उपोषणाद्वारे आंदोलन सुरू होते.
या आंदोलनादरम्यान त्यांनी वेळोवेळी अर्ज विनंती व निवेदन सादर केले. रविवारी दुपारी १२ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या उपोषण मंडपाला भेट दिली. नागरिकांशी संवाद साधला. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करून फाटक सुरू करण्यासंदर्भात २४ तासात निर्णय घेण्याचे निर्देश दिले. गडकरींच्या निर्देशानंतर आणि पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)
मुजोर अधिकाऱ्याला धडा शिकवा
आंदोलनादरम्यान येथील नागरिक अनेकदा रेल्वेच्या स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले. परंतु रेल्वेचे अधिकारी त्यांच्याशी असभ्य वागणूक करीत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी यावेळी केली. त्या पार्श्वभूमीवर मुजोर रेल्वे अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल करा. दलित-मागासवर्गीयांना त्रास दिला असेल तर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले. तसेच सरकार बदलले आहे. त्यामुळे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना अद्दल घडवावी, असा इशारासुद्धा त्यांनी यावेळी दिला.
उड्डाणपूल बांधणाऱ्या कंत्राटदाराला
काळ्या यादीत टाकणार
यावेळी मानकापूर उड्डाण पुलाची पाहणी केल्यानंतर उड्डाणपुलाचे डिझाईन मुळातच चुकीचे आहे. नाल्यामध्ये कॉलम उभे करण्यात आले आहेत. उड्डाणपुलाच्या चुकीच्या डिझाईनमुळे झिंगाबाई टाकळीत अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे या उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात येतील. तसेच यापुढे त्या कंपनीला राष्ट्रीय महामार्गाचे कुठलेही काम मिळणार नाही अशी व्यवस्था केली जाईल, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Start the Manakpur railway gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.