नागपूर विभागातील रेल्वेच्या 30 रेल्वे स्थानकांच्या मेकओव्हरला प्रारंभ

By नरेश डोंगरे | Published: August 4, 2023 07:51 PM2023-08-04T19:51:54+5:302023-08-04T19:53:35+5:30

पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी शिलान्यास : अमृत भारत स्टेशन योजना : ५५२.७ कोटींचा होईल खर्च : प्रवाशांना मिळणार हक्काच्या चांगल्या सोयी-सुविधा.

start of makeover of 30 railway stations in nagpur division | नागपूर विभागातील रेल्वेच्या 30 रेल्वे स्थानकांच्या मेकओव्हरला प्रारंभ

नागपूर विभागातील रेल्वेच्या 30 रेल्वे स्थानकांच्या मेकओव्हरला प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत मध्य रेल्वेच्या १५ आणि दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या १५ रेल्वेस्थानकांच्या अंत:बाह्य नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ रविवारी, ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांचा शिलान्यास व्हीडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून रविवारी करणार आहेत. त्यात मध्य आणि दपूम रेल्वेच्या क्षेत्रातील ३० रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या संबंधाची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी गुरुवारी तर दपूम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांनी आज शुक्रवारी पत्रकारांना दिली.

रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी ही योजना अंमलात आणली जात आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील घोडाडोंगरी, बैतूल, आमला, जुन्नारदेव, मुलताई, पांढूर्णा, नरखेड, काटोल, गोधनी, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, हिंगणघाट, चंद्रपूर आणि बल्लारशाह या रेल्वेस्थानकांचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कायापालट होणार आहे. त्यासाठी ३७२.७ कोटी रुपये खर्च केला जाणार असून, प्रत्येक स्थानकावर १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रीज, आकर्षक प्रवेश द्वार, पार्किंग, एप्रोचरोड आतमध्ये प्रवाशांना फलाटावर प्रशस्त जागा आणि वेटिंग हॉल, लिफ्ट, एस्केलेटर, इलेक्ट्रॉनिक कोच इंडिकेशन बोर्ड, स्वच्छतागृह आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ही सर्व कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचेही पांडे यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव तसेच जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत पगारे, अमोल गहूकर, समन्वयक राजेश चिखले उपस्थित होते.

वडसा, गोंदिया आणि चांदा फोर्ट

दपूम रेल्वेच्या क्षेत्रातील १५ स्थानकांवर या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १८० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. १५ पैकी वडसा (देसाईगंज), गोंदिया आणि चांदा फोर्ट या रेल्वेस्थानकांचा शिलान्यास रविवारी होईल, असे त्रिपाठी म्हणाल्या. यावेळी एकेडीआरएम ए. के. सूर्यवंशी, गती शक्ती युनिटचे प्रकल्प प्रमूख महावल प्रसाद तसेच वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दीपक कुमार उपस्थित होते.

५० वर्षांचा मास्टर प्लॅन

अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत ५० वर्षांचा मास्टर प्लॅन रेल्वे बोर्डाने तयार केला आहे. त्यामुळे केवळ आता साैंदर्यीकरण केले आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष केले, असे होणार नाही. तर, प्रदीर्घ काळापर्यंत त्याची चांगली देखभाल करण्याचीही योजना आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात नमिता त्रिपाठी यांनी सांगितले.

Web Title: start of makeover of 30 railway stations in nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.