१५ दिवसात मेयोची बंद 'ओटी' सुरू करा : संचालक लहाने यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:37 AM2019-09-14T00:37:20+5:302019-09-14T00:38:32+5:30
मेयोचे सर्जिकल कॉम्प्लेक्समधील चार विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना दोन वर्षातच ‘फंगस’ लागतेच कसे, असा जाब विचारीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्यराव लहाने यांनी चांगलेच धारेवर धरले. येत्या १५ दिवसात बंद शस्त्रक्रियागृह सुरू करा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयोचे सर्जिकल कॉम्प्लेक्समधील चार विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना दोन वर्षातच ‘फंगस’ लागतेच कसे, आणि दोन महिने होऊनही समस्या निकाली का निघत नाही, असा जाब विचारीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्यराव लहाने यांनी चांगलेच धारेवर धरले. येत्या १५ दिवसात बंद शस्त्रक्रियागृह सुरू करा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दोन वर्षापूर्वी सुरू झालेल्या सर्जिकल कॉम्प्लेक्समधील अस्थिव्यंगोपचार विभाग, कान, नाक व घसा विभाग, नेत्ररोग विभाग व आता शल्यचिकित्सा (सर्जरी) विभागाच्या शस्त्रक्रियागृहाला (ओटी) बुरशी (फंगस) लागल्याने सर्व ‘ओटी’ बंद पडल्या आहेत. या विभागांनी तात्पुरती आपली सोय केली आहे. नेत्ररोगाच्या रुग्णांची शस्त्रक्रिया डागा रुग्णालयात केली जात आहे. परंतु या सर्व सोईंना मर्यादा पडत आहे. परिणामी, शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्याच्या स्थितीत ५०० वर रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. ‘लोकमत’ने ६ ऑगस्ट रोजी ‘मेयोच्या शस्त्रक्रियागृहाला लागले फंगस’, १८ ऑगस्ट रोजी ‘महिना होऊनही शस्त्रक्रियागृह बंदच’ तर २ नोव्हेंबर रोजी ‘शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत ५००वर रुग्ण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले. अखेर याची दखल वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. लहाने यांनी घेतली. १२ सप्टेंबर रोजी त्यांनी सायंकाळी ४ वाजता मेयोला भेट दिली. सूत्रानुसार, डॉ. लहाने यांनी आल्याआल्या बंद असलेल्या शस्त्रक्रियागृहांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे अधिकाऱ्यांचा ‘वर्ग’ घेतला. ‘एअर हॅण्डलिंग युनिट’ लावण्याचा चुकीचा निर्णय घेतलाच कसा, असा प्रश्न विचारीत, याला संपूर्णपणे बांधकाम विभागाचा विद्युत विभाग जबाबदार आहे. १५ दिवसात बंद शस्त्रक्रियागृह सुरू न झाल्यास ही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर, उपअधीक्षक डॉ. रवी चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आग लागलेल्या ‘एनआयसीयू’ची केली पाहणी
शॉर्ट सक्रिटमुळे आग लागल्याने सात नवजात बालकांचा जीव धोक्यात आलेल्या बालरोग विभागाच्या ‘एनआयसीयू’ची (न्युओनॅटल केअर युनिट) पहाणी डॉ. लहाने यांनी केली. त्यांनी ‘एनआयसीयू’ व ‘पीआयसीयू’ दहा-दहा खाटांचे करण्याच्या सूचनाही संबंधित विभाग प्रमुखांना व अधिष्ठात्यांना दिल्या. या घटनेला घेऊनही विद्युत विभागाला जाब विचारला.
वाढीव शिक्षकांचा प्रस्ताव पाठवा
डॉ. लहाने यांनी यावेळी सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा केली. त्यांंना येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या. मेयोच्या एमबीबीएसच्या जागा १५० वरुन २०० झाल्याने त्या तुलनेत शिक्षकांची पदे कमी पडत असल्याचे चर्चेतून समोर आले. त्यांनी वाढीव पदांचा प्रस्ताव २० ऑक्टोबरपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवा, अशा सूचना केल्या.
२५० खाटा वाढणार
सर्जिकल कॉम्प्लेक्स हे चार मजल्यांचे आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता आणखी २५० खाटांची गरज आहे, असे सांगून कॉम्प्लेक्सचे आणखी दोन मजले वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करा, आणि तो मंजूर करून घ्या, अशा सूचनाही डॉ. लहाने यांनी अधिष्ठाता डॉ. केवलिया यांना दिल्या. यावेळी त्यांनी ‘अॅडमिनीस्ट्रेशन बिल्डींग’च्या बांधकामाची पाहणी केली.
परिचारिकेकडून रुग्णाला अयोग्य वागणूक
एका परिचारिकेकडून रुग्णाला अयोग्य वागणूक मिळाल्याने मेयोच्या अपघात विभागात वाद निर्माण झाला. अखेर सुरक्षा रक्षकांना यात हस्तक्षेप करावा लागला. एका सामाजिक कार्यकर्त्यासोबत झालेल्या या प्रकरणाची तक्रार ते वरिष्ठांना करणार असल्याचे सांगितले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवार रात्री मेयोच्या अपघात विभागात रुग्णांची नोंद करणाऱ्या एका परिचारिकाच्या पुढे पाच-सहा रुग्ण रांगेत लागले होते. या रांगेत काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष इरसाद अली हे वृद्ध महिला मोहिनीदेवी टांक यांना घेऊन उभे होते. परंतु ती परिचारिका रुग्णांशी नीट संवाद साधत नव्हती. इरसाद अली यांच्याशीही त्यांनी मोठ्या आवाजाने संवाद साधला. त्यांनी आवाजाला घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद वाढला. परिचारिकाने सुरक्षा रक्षकांना बोलविल्याने पुढे हे प्रकरण शांत झाले. परंतु वेदना सहन करणाऱ्या रुग्णांशी परिचारिकेने दोन शब्द प्रेमाने बोलले तर तेवढाच त्यांना धीर मिळतो. मात्र हा प्रकार संताप व्यक्त करणारा असल्याचे इरसाद अली यांनी सांगितले. या प्रकारणाची तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले. प्रकरणासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.