गांधीसागर येथील कामाची चौकशी करून पागे उद्यान सुरू करा; उद्यान कल्याणकारी संस्थेची मनपाकडे मागणी
By गणेश हुड | Published: February 3, 2024 05:25 PM2024-02-03T17:25:22+5:302024-02-03T17:26:40+5:30
गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण आणि मजबुतीकरणाचे काम मागील चार वर्षापासून कासव गतीने सुरू आहे.
गणेश हूड, नागपूर : गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण आणि मजबुतीकरणाचे काम मागील चार वर्षापासून कासव गतीने सुरू आहे. विकासाच्या नावाखाली पागे उद्यान चार वर्षापासून बंद असल्याने या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. येथील अर्धवट व निकृष्ट विकास कामांची चौकशी करून उद्यान सुरू करण्यात यावे, अशी मागणी गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेने केली आहे.
उद्यान कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल गांधीसागर येथील समस्याबाबत निवेदन देवून चर्चा केली. रखडलेल्या व निकृष्ट दर्जाच्या विकास कामांची चौकशी करण्याची मागणी केली.
तलावाच्या दक्षिणेला बांधलेली भिंत पावसाळ्यात तुटून पडली.तलावातील गाळ व माती पूर्णपणे काढलेली नाही. ती काढून तलावामध्ये रेती टाकण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. तलावाचे मजबुतीकरण व सौंदर्यीकरण दर्जेदार होण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्याचे आश्वासन आंचल गोयल यांनी दिले.
शिष्टमंडळात गंगाधरराव पोडलीवार , अरुण गाडगे, कृष्णकुमार पडवंशी, राजू दैवतकर, मनीष सोलाडकर, संजय नारेकर, विलास देशकर, सुरेश वाडीभस्मे श्रेयश कुंभलकर, हेमंत बेहेरखेडे,नंदू लेकुरवाळे, देवेंद्र नेरकर, देवाजी ढगे, नीरज चोबे, बाबा तिवारी, श्रीकांत पुसतकर, प्रशांत चलते, शंकरराव हेडावू आदींचा समावेश होता.
पागे उद्यान सुरू करा :
विकासाच्या नावावर गांधीसागर तलावाचा परिसर, पागे उद्यान मागील काही वर्षापासून बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी नागरिकांना योगा व व्यायाम करता येत नाही. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बंद ठेवण्यात आलेले पागे उद्यान सुरू करुन तलावाचा परिसर खुला करण्याची मागणी शिष्टंमडळाने केली.