तूर खरेदी केंद्र सुरू करा
By admin | Published: June 20, 2017 02:01 AM2017-06-20T02:01:15+5:302017-06-20T02:01:15+5:30
राज्य शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र मध्येच बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना तूर खरेदीचे टोकण देण्यात आले होते,
राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : राज्य शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र मध्येच बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना तूर खरेदीचे टोकण देण्यात आले होते, त्यातील अनेकांच्या तुरी मोजण्यात आल्या नाही. त्यामुळे शासनाने तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली असून, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना निवेदन देण्यात आले.
यावर्षी तुरीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. त्यातच खुल्या बाजारातील तुरीचे भाव पडल्याने शासनाने हमीभावाप्रमाणे (प्रति क्विंटल ५,०५० रुपये) तुरीची खरेदी करावी, अशी मागणी जोर धरू लागली. त्यामुळे शासनाने बाजार समितीच्या आवारात नाफेड व एफसीआयच्या माध्यमातून तूर खरेदी केंद्र सुरू केले. यासाठी संबंधित शेतकऱ्यांना टोकण देण्यात आले. सदर खरेदी केंद्र मध्येच दोनदा बंद करण्यात आले. तूर खरेदीच्या मागणीचा रेटा वाढल्याने खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे या केंद्रावर ३१ मेच्यापूर्वी शेतकऱ्यांना टोकण देण्यात आले. त्या शेतकऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक खरेदी केंद्रावर तुरी विकायला नेल्या. मात्र, खरेदी केंद्र मध्येच बंद करण्यात आल्याने अनेकांच्या तुरी मोजणीविना खरेदी केंद्रावर पडून आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कमी किमतीत तुरी विकाव्या लागत आहे. याला आळा घालण्यासाठी शासनाने तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माजी मंत्री रमेश बंग यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे, अर्चना हरडे, विलास झोडापे, राहुल कांबळे, सोनू तितरमारे, संतोष नरवाडे, रमेश भोयर, साकेत बोबडे, नाना केणे, शंकरराव कुहिके, वंदना राऊत, निशांत घोडे, विनोद हरडे, गौरव हुडेले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.