कोंढाळीचे ग्रामीण रुग्णालय सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:47+5:302021-06-05T04:07:47+5:30
उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी केली पाहणी कोंढाळी : येथील बांधकाम होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची पाहणी उपजिल्हाधिकारी शीतल देशमुख यांनी ...
उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी केली पाहणी
कोंढाळी : येथील बांधकाम होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची पाहणी उपजिल्हाधिकारी शीतल देशमुख यांनी केली. याप्रसंगी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अद्ययावत वैद्यकीय सोयी-सुविधांसह कोंढाळीचे ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार रामकृष्ण जंगले, जिल्हा परिषद सदस्या पुष्पा शेषरावजी चाफले, पं.स. सदस्या लता धारपुरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद चाफले आदी याप्रसंगी उपस्थित होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण करीत येथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासंदर्भात उपस्थित लोकप्रतिनिधींनी देशमुख यांचे लक्ष वेधले.
कोंढाळी ग्रामपंचायतच्या सभागृहात कोविड आणि म्युकरमायकोसिस आजाराबाबत घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात चर्चाही करण्यात आली. सरपंच केशव धुर्वे, ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंह राठोड आदी यावेळी उपस्थित होते.