अंबाझरी तलावापुढील नव्या पुलाची दुसरी बाजू डिसेंबरपर्यंत सुरू करा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 05:19 PM2024-11-16T17:19:03+5:302024-11-16T17:20:14+5:30

Nagpur : उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत 'पीडब्ल्यूडी'ला निर्देश

Start the other side of the new bridge near Ambazari Lake by December | अंबाझरी तलावापुढील नव्या पुलाची दुसरी बाजू डिसेंबरपर्यंत सुरू करा

Start the other side of the new bridge near Ambazari Lake by December

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
अंबाझरी तलावापुढील रस्त्यावरील नवीन पुलाची दुसरी बाजू येत्या डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी सुरू करा, असे निर्देश उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. समितीच्या अध्यक्ष विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली.


अंबाझरी तलावापुढील रस्त्यावरचा जुना पूल अरुंद होता. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुराकरिता तो पूलही कारणीभूत होता. त्यामुळे जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आला आहे. पुलाची एक बाजू ११ ऑक्टोबर रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली तर दुसऱ्या बाजूची काही कामे बाकी आहेत. ती कामे तातडीने पूर्ण करा, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आले आहे. उच्चस्तरीय समितीची बैठक २८ ऑक्टोबर रोजी झाली. या बैठकीत इतरही कामांचा आढावा घेण्यात आला. पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी अंबाझरी तलावाची सुरक्षा भिंत बळकट करण्याचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली. तसेच पाणी सोडण्याची दारे बांधण्यासाठी दोनदा निविदा नोटीस प्रकाशित करण्यात आली, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याकरिता, पर्यायी उपायांवर विचार केला जात आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, महामेट्रो संचालकांनी क्रेझी कॅसल परिसरामध्ये नाग नदीचे पात्र १८ मीटर रुंद करण्याचे काम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल, असा दावा केला


पीडित नागरिकांची याचिका प्रलंबित 
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे अंबाझरी तलावाचे पाणी विविध वस्त्यांमध्ये शिरून हाहाकार माजला होता. परिणामी, रामगोपाल बाचुका व इतर पीडित नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून अंबाझरी तलाव व नाग नदी परिसरातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यात यावी, अंबाझरी तलाव किती सुरक्षित आहे, याचा अभ्यास करण्यात यावा, इत्यादी मागण्या केल्या आहेत. या प्रकरणात हे प्रतिज्ञापत्र दाखल केले गेले आहे. संबंधित उच्चस्तरीय समिती न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झाली आहे.

Web Title: Start the other side of the new bridge near Ambazari Lake by December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.