दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:02 PM2018-06-27T22:02:37+5:302018-06-27T22:05:56+5:30
नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून नागपूरवरून दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, अशी सूचना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून नागपूरवरून दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, अशी सूचना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत केली.
रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची १५३ वी बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी ‘डीआरएम’ सोमेश कुमार श्रीवास्तव होते. बैठकीत सदस्यांनी दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये एसी फर्स्टचा कोच लावावा, रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासी सुरक्षित नसून चोरीच्या घटना वाढल्याने रेल्वेगाड्यात आरपीएफची संख्या वाढवावी, रेल्वेगाडीत प्रवास करणाऱ्या डॉक्टरांचे नाव व मोबाईल क्रमांक रिझर्व्हेशनच्या वेळी लिहावा, आरक्षित कोचमध्ये चार्ट लावताना त्यावर टीटीई व कंडक्टरचे नाव मोबाईल क्रमांकसह समाविष्ट करावे, प्रवासात प्रवाशांना उच्च दर्जाचे भोजन पुरवून त्यांना भोजनाचे बिल द्यावे, रेल्वेगाडी क्रमांक २२११२ नागपूर-भुसावळ व्हाया इटारसी या गाडीला नियमित करावे, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये गर्दीच्या वेळी तिकीट तपासावे, अमरावती-जबलपूर गाडीला अजनी येथे थांबा द्यावा, धामणगाव रेल्वेस्थानकावर कोच इंडिकेटर बसवावे, धामणगावला व्हीआयपी गेस्ट रुम उपलब्ध करून द्यावी, नागपूर-पुणे एक्स्प्रेसला नियमित करावे आदी सूचना समितीचे सदस्य वसंत पालीवाल, अश्विन अग्रवाल, बाबुसिंग गहेरवाल, बसंत कुमार शुक्ला, डॉ. रवि वानखेडे, रेणुका कोटंबकर, चंद्रमोहन रणधीर, संजय धर्माधिकारी, महेंद्र दर्डा, किरण वैद्य, गगनेश प्रतापसिंग, दिलीप सांबरे आदींनी केल्या. ‘डीआरएम’ सोमेश कुमार श्रीवास्तव यांनी मागील वर्षात विभागात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा समितीचे सचिव कुश किशोर मिश्र यांनी प्रास्ताविकातून सदस्यांना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. बैठकीला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी उपस्थित होते. आभार सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांनी मानले.