ट्रामा केअर सेंटर सुरू करा
By Admin | Published: March 15, 2016 05:07 AM2016-03-15T05:07:04+5:302016-03-15T05:07:04+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) ट्रामा केअर सेंटर रखडले आहे. अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) ट्रामा केअर सेंटर रखडले आहे. अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. परिणामी, रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. रुग्णहितार्थ ‘ट्रामा केअर’ ताबडतोब सुरू करा, या मागणीला घेऊन सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना घेराव घालून समस्यांचे निवेदन दिले.
मेडिकलमध्ये दररोज हजारो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. पूर्वी गरिबांना मोफत औषधे देण्यात येत होते. मात्र, आता रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली जात आहे. दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना औषधे मोफत देण्याचा नियम आहे. परंतु त्यांनाही महागडे औषधे बाहेरून विकत घ्यावी लागत आहे. एक्स-रे, सोनोग्राफी मशीन वारंवार खराब होत असल्यामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पॅथालॉजीची सेवा २४ तास उपलब्ध नसल्याने रात्रीच्या रुग्णांना बाहेरून तपासणी करून आणावी लागत आहे. यंत्रे कमी असल्यामुळे रुग्णांवर १५ ते २० दिवस उपचारच होत नाही. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मेडिकलमधील डॉक्टर स्वत:च्या खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देतात. कर्मचारी रुग्ण तथा नातेवाईकांशी सौजन्याने वागत नाहीत. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना एमआरआय सेवा मोफत देणे, सीटी स्कॅन व इतर यंत्रे वाढविण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावर प्रस्ताव पाठविणार असल्याचे डॉ. निसवाडे यांनी सांगितले. मेडिकलच्या समस्या ताबडतोब मार्गी न लागल्यास राष्ट्रवादीतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. शिष्टमंडळात नगरसेवक दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, कादीर शेख, रवींद्र इटकेलवार, चरणजितसिंह चौधरी, महेंद्र भांगे, मोहन आगासे, साहिल सय्यद, प्रकाश मेश्राम आदींसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.(प्रतिनिधी)