अठरा वर्षांवरील लसीकरण सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:09 AM2021-05-08T04:09:06+5:302021-05-08T04:09:06+5:30
उमरेड : १८ पेक्षा अधिक वय असलेल्यांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची घोषणा करण्यात आली होती. १ मेपासून लसीकरणाचा हा जम्बो ...
उमरेड : १८ पेक्षा अधिक वय असलेल्यांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची घोषणा करण्यात आली होती. १ मेपासून लसीकरणाचा हा जम्बो कार्यक्रम आखण्यात आला होता. यासाठी दोन दिवसांपूर्वीच को-विन अथवा आरोग्य सेतू या अॅपवर पूर्वनोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळेल, असे सांगितले गेले होते. शासनाच्या या घोषणेनंतर असंख्य तरुणांनी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया केली. ही प्रक्रियाच पूर्ण होत नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे. लसीचा अपुरा पुरवठा, असे कारण यामागे असून अठरा वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करा, अशी मागणी केली जात आहे.
फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाचा पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. सोबतच अठरा वर्षांवरील फ्रंटलाईन वर्कर आणि व्यावसायिकांना सुद्धा लस दिली जात आहे. असे असले तरी, अठरा वर्षांवरील सर्वांसाठी सुविधा नसल्याने अनेकजण केंद्रावरून परत जात आहेत. नागपूर येथील पाचपावली हॉस्पिटल, आय. जी. आर. हॉस्पिटल आणि आयसोलेशन हॉस्पिटल, तसेच ग्रामीण रुग्णालय काटोल व प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान या पाच ठिकाणीच अठरा वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. नागपूरसह जिल्ह्यात केवळ पाचच ठिकाणी ही सुविधा आहे. अन्य ठिकाणच्या केंद्रात ही सुविधा अद्याप सुरू केलेली नाही. या कारणामुळे नोंदणीची प्रक्रिया सुद्धा अपूर्ण होत आहे.
कधी सुरू होणार?
लसीकरण केंद्रावर नागरिकांसाठी लेखी सूचना प्रसारित करण्यात आली आहे. त्यामध्ये सॉफ्टवेअर अपडेटअभावी १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या लाभार्थ्यांना लसीकरण होणार नाही, असा मजकूर यामध्ये आहे. शिवाय नागपूर जिल्ह्यात पाच ठिकाणी उपरोक्त स्वरूपाचे लसीकरण सुरू असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. सूचनापत्रात लसीकरण होणार नाही, असे कळविण्यात आले असले तरी, लसीकरण कधी सुरू होणार हे अद्याप अनुत्तरीत आहे.