वॉकिंग ट्रॅकचे काम सुरू करा : पालकमंत्र्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:11 AM2019-03-03T00:11:08+5:302019-03-03T00:12:12+5:30
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याचे आदेश शासनाने २० फेब्रुवारी २०१८ रोजी दिले होते. यासाठी विद्यापीठाने जागा उपलब्ध केली आहे. परंतु महापालिकेने कामाला अद्याप सुरुवात का केली नाही, अशी विचारणा करून काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याचे आदेश शासनाने २० फेब्रुवारी २०१८ रोजी दिले होते. यासाठी विद्यापीठाने जागा उपलब्ध केली आहे. परंतु महापालिकेने कामाला अद्याप सुरुवात का केली नाही, अशी विचारणा करून काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत दिले.
या ट्रॅकसाठी शासनाने ८ कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत. विद्यापीठाने जागाही दिली. सामंजस्य करार करून काम सुरु करणे शक्य होते. पण मनपाच्या अधिकााऱ्यांनी यासाठी कोणताही पाठपुरावा केला नाही. जागा दिल्यानंतर अडचणी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सोडवून घेणे अपेक्षित होते. या ट्रॅकचा वापर सकाळी आणि सायंकाळच्या वेळी सुमारे दहा हजार लोक करणार आहेत. लवकरात लवकर या कामातील अडथळे दूर करून काम सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क सुरू करण्यावर चर्चा
धरमपेठेतील ट्रॅफिक पार्क हा आतापर्यंत व्यावसायिक दृष्टीने चालला. पण पार्कमधील फूड कोर्ट आणि पार्कि गच्या समस्येमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागला. त्यात पार्क चालविण्यासाठीच्या परवान्याची मुदत संपली. पार्कि गसाठी कोणतीही जागा येथे उपलब्ध नाही. हा पार्क सुरु करून इच्छुक संस्थेला चालविण्यासाठी देता येऊ शकतो. पार्कच्या मागील बाजूला असलेली विद्यापीठाची जागा पार्किंगसाठी मिळावी असाही सूर काही जणांचा या बैठकीत होता. वाहतूक पोलीस विभागानेही हा पार्क दीड कोटी रुपयांमध्ये चालविण्यास मागितला असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. शाळकरी मुलांना वाहतूक नियमांचे प्राथमिक प्रशिक्षण देण्याची येथे व्यवस्था आहे. मनोरंजनाचा पार्क करायचा असेल तर तो व्यावसायिक दृष्टीने चालवावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.