कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करा : महापौर संदीप जोशी यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:44 PM2020-06-26T23:44:50+5:302020-06-26T23:46:11+5:30
महापालिकेत मागील काही दिवसात जे घडले ते योग्य नाही सर्वांनी मिळून नियमांच्या चाकोरीत काम करून शहर विकास व जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा. स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या व १८ मार्चपर्यंत कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना शुक्रवारी सर्वसाधारण सभेत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत मागील काही दिवसात जे घडले ते योग्य नाही सर्वांनी मिळून नियमांच्या चाकोरीत काम करून शहर विकास व जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा. स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या व १८ मार्चपर्यंत कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना शुक्रवारी सर्वसाधारण सभेत दिले.
कोविड-१९ नियंत्रणासाठी उपाययोजना करताना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. नियोजन नसल्याने कोरोना संसर्ग वाढला. असा आरोप करून सत्तापक्षाने पाच दिवस आयुक्तांना धारेवर धरले. सदस्यांची आक्रमक भूमिका लक्षात घेता विविध मुद्यावर ६ जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश संदीप जोशी यांनी दिले.
इंदिरा गांधी रुग्णालयात अनियमितता असल्याबाबतचा प्रश्न नगरसेविका परिणिता फुके यांनी शुक्रवारी पुन्हा सभागृहात उपस्थित केला. डॉ. प्रवीण गंटावर उपस्थित नसतानाही वेतन घेत आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली. रेकॉर्डला खाडाखोड करण्याचे प्रकार सुरू असल्याने रजिस्टर ताब्यात घेण्याची मागणी केली.
महापौरांचे आदेश, आयुक्तांवर नेम
स्थायी समितीची परवानगी न घेता रजेवर जाणारे आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी ६ जुलैपर्यंत स्पष्टीकरण द्यावे.
स्थायी समितीची मंजुरी न घेता प्रसार माध्यमांना मुलाखती दिल्या संदर्भात आयुक्तांनी ६ जुलैपर्यंत स्पष्टीकरण द्यावे.
केटी नगर येथील कोविड केअर सेंटर येथे झालेल्या खर्चाची चौकशी करून अहवाल सादर करा.
नव्याने विकसित केलेल्या पाच रुग्णालयाची चौकशी करून स्थायी समिती अध्यक्षांनी अहवाल सादर करावा.
काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार परत घेण्याबाबतचा ठराव राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा.
महापौरांनी दिलेले निर्देश
उद्यानाप्रणामे नासुप्रचे विभाग हस्तांतरणाची प्रक्रिया राबविण्यात यावी.
चेंबर रिपेअरसाठी किती खर्च झाला याची चौकशी करून १५ दिवसात अहवाल द्यावा.
नागरिकांना वेठीस धरणारा उपद्रव शोध पथकातील कर्मचारी संदीप उपाध्याय याला तात्काळ काढा.
पथदिव्यांची फाईल रोखणाऱ्या तत्कालीन वित्त अधिकारी मोना ठाकूर यांच्यावर शिस्तभंग कारवाईची शिफारस करावी.
व्हिडिओच्या माध्यमातून संत तुकाराम यांचा उल्लेख करून नगरसेवकांविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.
कोविड-१९ अंतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजना व नियोजन यांचा अहवाल ६ जुलैपर्यंत सादर करा आयुक्तांना निर्देश.