अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेला सुरुवात
By admin | Published: June 3, 2016 02:58 AM2016-06-03T02:58:25+5:302016-06-03T02:58:25+5:30
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून गुरुवारपासून प्रक्रियेला सुरुवात झाली.
चार फेऱ्यांमध्ये होणार प्रवेश : ‘फ्रीझ‘, ‘स्लाईड’, ‘फ्लोट’ला महत्त्व
नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून गुरुवारपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. राज्यभरातील शासकीय व सरकारी महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया ‘कॅप’ मार्फत राबवली जाईल. मोठ्या प्रमाणावर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्याचे मोठे आव्हान यंदा महाविद्यालयांसमोर आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १६ जून ही आहे. नागपूर विभागातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या एकूण २५,२९२ जागा आहेत.
‘जेईई-मेन्स’ आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक व प्रवेशप्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत होती. अखेर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेशप्रक्रियेसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. यंदादेखील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन असेल. तंत्रशिक्षण संचालनालयाने स्थापित केलेल्या निरनिराळ्या ‘एआरसी’तून (अप्लिकेशन अॅन्ड रिसिप्ट सेंटर) विद्यार्थी आपले अर्ज भरू शकतात. एआरसीमध्ये आपला अर्ज दाखल करतानाच विद्यार्थी आपली प्रमाणपत्रे पडताळून
घेऊ शकतात. (प्रतिनिधी)
प्रवेशाअगोदर विद्यार्थ्यांना करावी लागणार नोंदणी
प्रवेशप्रक्रियेअगोदर विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ नोंदणी करावी लागणार आहे. ‘डीटीई’च्या नव्या नियमांनुसार यंदा विद्यार्थ्यांना आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. याअगोदर ‘सीईटी’त चांगले गुण मिळाल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना आवडते महाविद्यालय किंवा शाखा मिळत नव्हती. पहिल्या फेरीत जे महाविद्यालय मिळाले आहे, तेथेच प्रवेश घ्यावा लागत होता. आता ‘कॅप’च्या पहिल्या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांना १०० महाविद्यालयांचा विकल्प द्यावा लागणार आहे. जर विद्यार्थ्यांना आवडते महाविद्यालय मिळाले नाही, तर ते दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. त्यातदेखील आवडते महाविद्यालय मिळाले नाही तर त्यांना तिसऱ्या फेरीत सहभागी होण्याची संधी मिळेल. चौथ्या फेरीत त्यांना महाविद्यालयांचे विकल्प बदलण्याची संधी मिळेल. प्रक्रियेदरम्यान जागेसंदर्भातील आपली भूमिका विद्यार्थ्यांना ‘फ्रीझ’, ‘स्लाईड’, ‘फ्लोट’ या विकल्पांतून सांगता येणार आहे.